या सरकारने ओबीसींना काहीच दिले नाही, मराठ्यांना दिला भरपूर निधी; प्रकाश शेंडगे यांचा आरोप

Prakash Shendge - Uddhav Thackeray

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) ओबीसी (OBC) समाजासाठी केवळ घोषणाच केल्या, दिले काहीच नाही. याउलट मराठा समाजाला भरभरून निधी दिला. हा अन्याय आम्ही आता सहन करून घेणार नाही, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी दिला.

रविवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणालेत, राज्य सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केला. ओबीसी समाजाच्या विकासासाठी उपसमिती स्थापन केली होती; पण बैठकांपलीकडे फार काही झाले नाही. त्यामुळे सरकारने आता ही समिती बरखास्त करावी.

सरकारमधील नेते मराठा आणि ओबीसी वाद लावत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करतात. मात्र, हा वाद त्यांच्या काळात सुरू झाला आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातून आरक्षण दिले. त्यामुळे या वादासाठी फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारने वर्षभरात ओबीसी समाजासाठी केवळ घोषणाच केल्या; पण दिलं काहीच नाही. याउलट मराठा समाजाला भरभरून निधी दिला. गेल्या आठवड्यात SEBC प्रवर्गातील मुलांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याबाबत जीआर काढण्यात आला. हा जीआर रद्द व्हावा यासाठी मराठा समाज शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचे समजले. त्यानंतर सरकारने हा जीआर रद्द केला तर ओबीसी समाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरावर मोर्चा काढेल, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

आगामी काळात ओबीसी समाजाचे आरक्षण वाचावे यासाठी आम्ही ‘ओबीसींची वारी, आमदारांच्या दारी’ अशी मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहचावा यासाठी आम्ही पुढील आठवड्यात ही वारी घेऊन ‘मातोश्री’च्या जवळचे नेते अनिल परब यांच्या घरी जाणार आहोत. सर्व मंत्र्यांना सळो की पळो करून सोडू, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

छगन भुजबळांनी ‘त्या’ लोकांची नावे जाहीर करावी
मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येतात, असे वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. त्यावर प्रकाश शेंडगे यांनी आव्हान दिले, छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील या लोकांची नावे जाहीर करावीत. ओबीसी समाजाचे शत्रू कोण आहेत, हे जगासमोर आणावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER