हा खेळ बदल्यांचा

badgeवादग्रस्त अधिकारी आणि नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) बदलून नव्या जागी जाण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली. म्हणजे बदलीची बदली. मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी त्यांची बदली झाली होती. २६ ऑगस्टला हा आदेश निघाला, त्याच्या दोन दिवस आधी मुंढे यांना कोरोनाने गाठले. कोरोनाबाधित असतानाही त्यांना उचलण्यात आले. १५ दिवसांत निगेटिव्ह होऊन ते नवी सूत्रे घ्यायला निघाले तर बदली रद्दचा फतवा आला. आता नव्या कुठल्या जागी जायचे हेही सरकारने सांगितलेले नाही. म्हणजे लटकले. मनुकुमार श्रीवास्तव (Manukumar Srivastava) यासारखा ज्येष्ठ अधिकारी महिनाभर वेटिंगवर होता. आता बोला. डझनभर सरकारी अधिकाऱ्यांची अशीच अवस्था आहे. बदली होऊनही पोस्टिंग झाले नसल्याने टांगलेले आहेत. त्या रांगेत आता मुंढेही आले आहेत. आपल्याला कुठे जायचे ते त्यांना ठाऊक नाही. कुठे जायचे, किती थांबायचे याची ज्यांना शाश्वती नाही ते अधिकारी काय प्रशासन देऊ शकतील? पण ‘गतिमान सरकार’ (Gatiman Sarkar) म्हणायला मुख्यमंत्री मोकळे.

१५ वर्षांच्या सेवाकाळातली मुंढे यांची ही १६ वी बदली आहे. म्हणजे सरासरी दरवर्षी बदली. मुंढे जिथे जिथे जातात तिथे तिथल्या लोकप्रतिनिधींशी पंगा घेतात. नगरसेवकांशी पंगा घेणारा अधिकारी लोकांना आवडतो. मुंढे यांनी पब्लिकची ही
नस ओळखली आहे. त्यामुळे लोकांच्या नजरेत ते हिरो आहेत. नागपुरात ते आठ महिने होते. इथल्या नगरसेवकांशी वाद घालून त्यांनी काय मिळवले हा वादाचा विषय होईल; पण लोकांना आवडते. नागपूर सोडून मुंढे निघाले तेव्हा त्यांच्यावर फुले उधळायला कोरोनाकाळातही शेकडो नागरिकांनी गर्दी केली. ‘मी बाडबिस्तरा घेऊनच फिरतो’ असे मुंढे म्हणतात. मुंढे यांना ही चैन परवडत असेलही. पण प्रशासनाला कसे परवडते? सरकारी अधिकाऱ्याला किमान दोन वर्षे एका जागी राहावे लागते. तसा संकेत आहे. त्यानंतर बदलीचा विषय येतो. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातले महाविकास आघाडीचे सरकार आल्या दिवसापासून नेमणुका-बदल्यांभोवती फिरताना दिसत आहे. साधारणपणे उन्हाळा हा बदल्यांचा मोसम असतो. पण आता पावसाळा  संपत आला असताना आणि कोरोनाने भयावह रूप धारण केले असताना बदल्यांचा घोळ थांबायला तयार नाही. सरकारी अधिकारी म्हणजे पाण्यातली म्हैस. नियमांवर बोट ठेवणारा. अशा वेळी आपली अडचण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री आपल्या ठेवणीतले अधिकारी मोक्याच्या जागी आणतात. ते समजू शकते. पण बदल्यांचा घोळ समजण्यापलीकडे आहे. ‘आम्ही दिवसाढवळ्या कामे करतो’ असा दावा करणाऱ्या उद्धव यांना बदल्यांची साधी शिस्त जमू नये? मागे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी परस्पर केलेल्या मुंबईतील काही पोलीस उपायुक्तांच्या बदल्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या. सर्वांना विश्वासात घेऊन बदल्या करण्याचे ठरले. तरीही भानगडी सुरू आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे मुंढे नावाची बला अंगावर घ्यायला तयार नव्हते. पाटील जळगावचे. त्यांनी गावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर (Kishor Raje Nimbalkar) यांची ऑर्डर काढायला लावली. धारावीत पाठवलेल्या अनिल डिग्गीकर (Anil Diggikar) यांना  अवघ्या चार तासांत बदलून म्हाडा दिले. अशा अनेक बदल्या आहेत. पोटातच त्या रद्द होतात.

त्यामागे काय राजकारण, अर्थकारण खेळले जाते सामान्य माणसाला कळायचा प्रश्न नाही. कोरोनाला रोखण्याच्या कामात उद्धव सरकार (uddhav Thackeray) रिझल्ट देऊ शकले नाही. त्याचे कारण ढेपाळलेले प्रशासन आहे. कोरोनाने लोक मरत असताना सरकारला बदल्या सुचतात कशा? आरोग्यमंत्री खूप दावा करतात; पण नागपुरात कोरोनाबाधिताला रुग्णालयात बेड मिळत नाही. व्हेंटिलेटर नाहीत, ऑक्सिजन नाही…हे कटुवास्तव आहे. लोक ओरडत आहेत; पण कुणाला सांगतील? ऐकणार कोण? मुख्यमंत्री उद्धव सरकार बदल्याभोवती फिरत असल्याने प्रशासन ढेपाळले आहे. त्यामुळे कोव्हिड हॉस्पिटल आहेत; पण सोयी नाहीत. आता जनताच बदलीचा ऑर्डर काढेल; पण त्यासाठी २०२४ पर्यंत थांबायचे का?

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER