ही दिवाळी इतिहास घडवेल…

Coronavirus - Diwali Editorial

Shailendra Paranjapeऐन दिवाळीत (Diwali) सीमेवर धारातीर्थी पडलेल्या शूरवीरांच्या बातम्या आल्या की काळजाला चीर पडते. `कुछ याद उन्हे भी करना, जो लौटके घर ना आये’, या `ऐ मेरे वतन के लोगो…’ गाण्यातल्या ओळी आठवतात. मन विषण्ण होतं. मग मनात विचार येतो की युद्ध काय फक्त सीमेवरच लढलं जातं का…

करोनाच्या (Corona) सावटाखाली जवळपास आठ महिने गेले आणि विविध धर्मीयांचे बहुतांश सण, धार्मिक उत्सव करोना बंधनांमुळे यंदा साजरे झाले नाहीत. पण देशातल्या सर्वधर्मीयांकडून साजरी केली जाणारी दिवाळी मात्र करोनाचं सावट कमी होत चालल्याची जाणीव देऊन गेली.

जगभर अनेक देशात करोनाची दुसरी लाट येत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळेच आपल्या देशातही त्याबद्दल पूर्वकाळजी घेणं गरजेचं आहेच. करोनावर लस येत नाही, तोपर्यंत स्वच्छता, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहेच. पण पहिल्या लाटेची तीव्रता नक्कीच कमी झालीय, याचं प्रत्यंतर दिवाळीच्या काळात आलंय, ही निश्चितच जमेची बाजू आहे.

जगभरच्या अनेक कंपन्या लसविकसनाचे दावे करत आहेत. ताज्या दाव्यांनुसार एका कंपनीच्या लशीला ९५ टक्के यश मिळाल्याचं वृत्त प्रसारित झालंय. सहा ते आठ प्रमुख कंपन्या जागतिक पातळीवर लसविकसनात गुंतल्या आहेत. त्यापैकी बहुतेकांचं वेळापत्रक पाहिलं तर सामान्य नागरिकांपर्यंत लस पोचायला मार्च ते एप्रिल महिना उजाडणार आहे. त्यामुळे येणारे तीन चार महिने तरी करोनाविषयक बंधनं पाळायलाच हवीत, हे श्रेयस्कर आहे.

लसविकसनाच्या शुभवर्तमानाबरोबरच दिवाळी साजरी करताना देशभरातल्या प्रमुख शहरांमधे सर्वेक्षण करण्यात आलंय. देशपातळीवर कार्यरत असलेल्या व्यापारी महासंघाच्या वतीनं हे सर्वेक्षण केलं गेलंय. त्यानुसार देशभरात साधारणपणे दिवाळीच्या काळात ७२ हजार कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली गेलीय, हेही करोनाचं सावट कमी झाल्याचंच लक्षण आहे.

देशभरातल्या प्रमुख वीस शहरातून या व्यापारी महासंघानं गोळा केलेल्या माहितीनुसार घरगुती वापराच्या वस्तू, वस्त्रप्रावरणं, चपला, मिठाई, खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची उलाढाल लक्षात घेतली तर देशपातळीवर ती ७२ हजार कोटींच्या घरात होती आणि तीदेखील दिवाळीच्या दिवसातली उलाढाल आहे. नवी दिल्ली, मुंबईसह बंगलोर, कोतकता, नागपूर, चेन्नई, रायपूर, भोपाळ, कानपूर, लखनौ, अहमदाबाद अशा प्रमुख वीस शहरातून हे सर्वेक्षण करण्यात आलंय.

विशेष म्हणजे यंदा चिनी वस्तूंना फाटा देण्यात आल्यांच दिसून आलंय. त्यातून चीनला फक्त भारतीय बाजारपेठेत सोसावा लागलेला तोटा सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांचा आहे, असंही कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं नमूद केलंय. ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे कारण ही गोष्ट सामान्य नागरिकांना समजली तर सीमेवर आगळीक करण्याचं धारिष्ट्य ना चीन करेल ना पाकिस्तान.

बदलत्या परिस्थितीत २१ व्या शतकात अत्याधुनिक शस्त्रास्त्रं, अद्ययावत तंत्रज्ञान याबरोबरच राष्ट्राची आर्थिक ताकद, यालाही तितकचं किंबहुना अधिकच महत्त्व आहे. त्यामुळे दिवाळीची उलाढाल करोनाचं सावट कमी झाल्याचं सिद्ध करतेच आहे पण त्याहीपेक्षा चिनी वस्तूंचा कमीत कमी किंवा नगण्य वापर ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अशी आत्मनिर्भरता, आर्थिक ताकद आली तर १३५ कोटी लोकसंख्या असलेली भारताची बाजारपेठ जगाच्या अर्थकारणाचे नियम ठरवू शकेल, त्यावर हुकूमत गाजवू शकेल. त्याची सुरूवात या दिवाळीत झाली असेल तर ही दिवाळी करोनामुळं नाही तर आत्मनिर्भरतेमुळे भविष्यातही लक्षणीय ठरेल आणि इतिहास घडवेल.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER