
क्रिकेटमध्ये हा दिवस कधी ना कधी येणारच होता कारण व्यत्यय आलेल्या सामन्यांमध्ये विजयाचे लक्ष्य ठरविणारी डकवर्थ-लुईस (Duckworth- Lewis) प्रणाली आहेच एवढी किचकट की ती कुणालाच समजत नाही. मॕच रेफ्रींना (Match Referee) कळत नाही, पंचांना कळत नाही, एवढेच काय तर संगणक तज्ज्ञांनाही ती कळत नाही. त्यामुळे बहुतेकदा डकवर्थ-लुईसनुसार आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ज्यावेळी संघाना टारगेट दिले जाते तेंव्हा भुवया उंचावल्याशिवाय रहात नाहीत.
याचा सर्वात मोठा गोंधळ मंगळवारी नेपियर (Napier) येथे न्यूझीलंड (New Zealand). आणि बांगलादेशदरम्यानच्या (Bangladesh) दुसऱ्या टी-20 सामन्यात बघायला मिळाला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणण्याआधी न्यूझीलंडने 17.5 षटकात 5 बाद 173 धावा केल्या. मात्र त्यानंतर बांगलादेशला विजयासाठी किती षटकात नेमक्या किती धावा करायच्या आहेत तेच स्पष्ट कळविले गेले नव्हते. त्यांना 16 षटकात 148 धावा करायच्या आहेत अशा अधिकृतरित्या पुष्टी न झालेल्या टारगेटसह मैदानात उतरावे लागले मात्र क्रिकेटचे जे आकडेवारी तज्ज्ञ आहेत त्यांच्यामते डकवर्थ-लुईसनुसार हे टारगेट 16 षटकात 171 धावा असायला हवे होते पण मॕच रेफ्री जेफ क्रो निश्चितपणे काहीच सांगू शकत नव्हते.
अशा अनिश्चिततेतच बांगलादेशने खेळायला सुरुवात केली. त्यावेळी 16 षटकात 148 धावा हे त्यांना लक्ष्य होते. नेमकं काय करायचंय हे जाणून घेण्यासाठी बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डाॕमिंगो हे मॕच रेफरींकडे गेलेसुध्दा होते आणि जेमतेम 9 चेंडूंचा खेळ होत नाही तोच खेळ थांबविण्यात आला कारण बांगलादेशसाठी विजयी लक्ष्य काय आहे तेच निश्चित नव्हते. मॕच रेफ्रीच्या कक्षात आता कागद, पेन आणि काॕम्प्युटर अशा सर्व प्रकारे आकडेमोड सुरु होती. बांगलादेशच्या प्रशिक्षकापाठोपाठ त्यांचे व्यवस्थापकही तेथे पोहोचले होते. तोवर बांगलादेशने बिनबाद 12 धावा केलेल्या होत्या. अशावेळी निरोप आला की, बांगलादेशला विजयासाठी 170 धावा करायच्या आहेत.
कुठे 148 आणि कुठे 170? तब्बल 22 धावांचा फरक पडला. तरीही गोंधळ संपला नव्हता…डकवर्थ – लुईस प्रणालीच्या जाणकारांनुसार 170 धावांवर सामना ‘टाय’ होणार आणि विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य होते पण अधिकृत सुचनेप्रमाणे बांगलादेशने 170 धावांचे लक्ष्य घेऊन खेळ सुरू केला पण शेवटी ते 16 षटकात 7 बाद 142 धावाच करू शकले आणि बांगलादेशला डकवर्थ -लुईस प्रणालीनुसार 28 धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र या पराभवासाठी कुणाला जबाबदार धरायचे? हा जो गोंधळ होता त्याची जबाबदारी कुणाची? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. बांगलादेशाऐवजी भारत, आॕस्ट्रेलिया वा इंग्लंडसारखा ताकदवान संघ असता तर हे खपवून घेतले असते का? हासुध्दा प्रश्न आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला