सर्व संकटातही उद्धव ठाकरे खंबीर; शेवटी बाळासाहेबांचा पुत्र…वारसा संघर्षाचा : शिवसेना

CM Uddhav Thackeray
  • मुख्यमंत्री ठाकरेंचे हे व्यंग्यचित्र होतेय व्हायरल
  • सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल

मुंबई : निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकले आहे. हे वादळ आता मुंबईच्या दिशेने घोंघावत आहे. मुंबईत या वादळाचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक भागांतील झाडे कोलमडली आहेत. काही भागांत छपरे उडाली आहेत. मात्र, या वादळाचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने महाराष्ट्र प्रशासन या वादळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. बीएमसीच्या शाळांमध्ये त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. मुंबई महापालिका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत.

या वादळाचा मुंबईला सर्वाधिक फटका बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्या दृष्टीने प्रशासन सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, दोन दिवस शक्यतोवर मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरेंनी केले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यावर संकटावर संकटे येत आहेत. मुख्यमंत्री होताच दोन महिन्यांतच राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाची स्थिती हाताळतानाच निसर्ग चक्रीवादळ धडकले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कधीही प्रत्यक्ष प्रशासनाचा अनुभव नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी हे आव्हान सजगतेने पेलणे याविषयी राज्यभरातून मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक होत आहे.

अर्शद वार्सी यांनीही मुख्यमंत्री ठाकरेंचे यासाठी कौतुक केले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या फेसबूक पेजवरील मुख्यमंत्री ठाकरेंचे व्यग्यचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री झाले आणि लगेच कोरोना महामारी, निसर्ग चक्रीवादळ आले; पण तरीदेखील उद्धवसाहेब खंबीरपणे उभे आहेत. शेवटी बाळासाहेबांचा पुत्र….वारसा संघर्षाचा आहे. अशी पोस्ट शिवसेनेने केली आहे. या व्यंग्यचित्रात घाणेरडे राजकारण, कोरोना, निसर्ग चक्रीवादळ या खांबाला अडवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दाखवण्यात आले आहे. ‘सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल. साहेब सलाम तुमच्या जिद्दीला आणि सलाम तुमच्या कर्तृत्वाला’ अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER