हा पुरस्कार माझ्या लेकरांना दोन घास घालणाऱ्यांसाठी आहे – सिंधूताई सपकाळ

पुणे :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची आई सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंधूताई सपकाळ या पुरस्काराबद्दल बोलताना भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या.‘हा पुरस्कार माझ्या लेकरांना दोन घास पुरवण्यासाठी आहे. मी अनाथांची माय झाले, तुम्ही सगळे जण गणगोत व्हा.’ अशा शब्दांत सिंधूताई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सिंधूताई म्हणाल्या, ‘या पुरस्कारासाठी मी कधी जगले नाही. पुढे जात राहिले, काम करत राहिले. माझ्या लेकरांनी माझी काळजी घेतली. माझ्या लेकरांच्या तोंडात दोन घास घालण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांच्यासाठी हा पुरस्कार अर्पण करते.’ अशी भावना सिंधूताईंनी व्यक्त केली. तसेच त्या म्हणाल्या, ‘आजपर्यंत फाटलेले आयुष्य मी शिवत शिवत आले. टाके घातले, तुम्ही सर्वांना दोरा दिला. अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे. लाखो लेकरांना पदरात घ्यायचे आहे, तरच मला सुख मिळणार आहे. मी अनाथांची माय झाले, तुम्ही सर्व जण गणगोत व्हा, मायी तुमची आभारी आहे.’ असं म्हणत सिंधूताईंनी केंद्र सरकारचे आभार मानले.

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च सन्मान असलेल्या पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. पद्मश्री पुरस्कारामध्ये फासेपारधी समाजासाठी काम करणारे गिरीश प्रभुणे, सिंधूताई सपकाळ, जसवंतीबेन पोपट, नामदेव कांबळे, परशुराम गंगावणे यांचा समावेश आहे.

यामध्ये सात जणांना पद्मविभूषण, १० जणांना पद्मभूषण आणि १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. (Padma Award announced) पद्मभूषण या विभागात महाराष्ट्रातील रजनीकांत श्रॉफ यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालासुब्रमण्यम यांना देण्यात आला आहे. तर तरुण गोगोई आणि रामविलास पासवान, केशुभाई पटेल या राजकीय नेत्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जपानचे पूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण, तर दिवंगत गायक एस. पी.  बालासुब्रमण्यम (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

ही बातमी पण वाचा : सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री घोषित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER