ही अभिनेत्रीही आहे अस्थमाची शिकार

Kajal Agrawal

बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक कलाकार कोणत्या ना कोणत्या व्याधीने आजारी असतात. मात्र ते आपली व्याधी लोकांसमोर येऊ देत नाहीत. अगदी अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान(Sharukh Khan), ऋतिक आणि सोनमपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेक कलाकार व्याधीग्रस्त असून त्यांनी यावर उपचारही घेतलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रियांका चोप्राने तिला अस्थमा असल्याचे जाहीर केले होते. त्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनीही त्यांना असलेल्या व्याधीची माहिती जाहीर केली होती. या यादीत आता साऊथची प्रख्यात अभिनेत्री काजल अग्रवालचीही (Kajal Agrawal) भर पडली आहे. काजलचे नुकतेच लग्न झाले असून तिने तिला असलेल्या अस्थमा आजाराची माहिती सोशल मीडियावर शेअर (Social Media) केली आहे.

सध्याचे बहुतेक सगळे कलाकार सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून जीवनातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सपर्यंत पोहोचवत असतात. काजलने तिच्या लग्नाचे, हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. काजलने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसह तिला असलेल्या आजाराची माहितीही दिली आहे. तिची ही पोस्ट वाचून अनेक फॅन्स प्रभावित झाले असून यापासून ते बोध घेत असल्याचे त्यांच्या उत्तरावरून दिसत आहे.

काजलने शेअर केलेल्या फोटोसोबत तिला अस्थमाचा त्रास असून ज्यांना असा त्रास आहे त्यांनी इनहेलर वापरलेच पाहिजे असेही म्हटले आहे. काजलने लिहिले आहे, मी जेव्हा 5 वर्षांची होते तेव्हा मी ब्रोन्कियल अस्थमाची शिकार झाले. यामुळे मला आवडणारे अनेक पदार्थ मी खाऊ शकत नव्हते. एका लहान मुलापासून त्याला आवडणारे चॉकलेट दूध दूर ठेवले तर त्याची काय स्थिती होत असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. माझ्यासाठी तो काळ खूपच कठिण होता. परंतु जस-जशी मी मोठी होत गेले मला त्याची सवय झाली. प्रवास करताना, थंडीत किंवा धुळीमुळे मला खूप त्रास होत असे. त्यामुळे माझा श्वास कोंडत असे आणि त्यामुळेच मी इनहेलर सोबत ठेवत आले आहे. जेव्हा जेव्हा मला श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हा तेव्हा मी इनहेलरचा वापर करते. त्यामुळे मला खूप आराम मिळतो. इनहेलरचा वापर करताना लाजण्याचे कारण नाही असेही काजलने म्हटले आहे. या पोस्टसोबत काजलने #SayYesToInhalers असेही लिहिले आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रियांकाने अस्थमाची शिकार असल्याचे सांगितले होते. आणि त्यानंतर काही दिवसांनी ती एका इनहेलरची जाहिरात करताना दिसली होती. काजलही त्याच मार्गावर नाही ना असा प्रश्नही बॉलिवूडमध्ये विचारला जाऊ लागला आहे. याचे उत्तर लवकरच कळेल म्हणा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER