अति कृशता – कारणे व उपाय योजना

लेखांक 2

अति कृशता - कारणे व उपाय योजना

आधीच्या लेखात अति कृशतेची (Thinness)कारणे आपण बघितली. त्यावरून लक्षात आले असेल की अन्नाचे योग्य पाचन व शरीर पोषण होण्याकरीता स्निग्ध ताजे षडरसयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. याशिवाय मनाला आवडणारे, प्रसन्न वातावरणात घेतलेले अन्न शरीर पुष्ट करते. स्वच्छ जागेवरील स्वच्छ भांड्यांमधे शिजविलेले व वाढलेले जेवण भूक वाढवते. हे सर्व का करायचे कारण जेवण करणे म्हणजे फक्त “उदरभरण” नाही.

अतिकृश का असू नये तर ज्या व्यक्ती खूप बारीक असतात त्यांना शारिरीक कष्ट सहन होत नाही. जास्त खाल्ले की त्रास होतो. अशा लोकांना औषध, अति उष्ण- अति थंड आहार विहार सहन होत नाही. अशा व्यक्तींना सर्दी खोकला दमा अर्श (मूळव्याध) (piles) ग्रहणी रोग लवकर होऊ शकतात. म्हणजेच या व्यक्ती नाजूक जास्त असतात. शारीरिक सहनशक्ति या लोकांची कमी असते.

यावर उपाय काय ?

 अति कृशता – कारणे व उपाय योजनामुख्यतः कृश व्यक्तींची अग्नि मंद असतो पाचन शक्ती कमजोर असते त्यामुळे अशांनी लवकर पचणारा हलका पण शक्ति वाढविणारा आहार घ्यावा. वजन वाढवायचे म्हणून पचायला जड पदार्थ, प्रोटीन पावडरचा मारा करणे किंवा खूप खाणे हा उपाय नाही. हळूहळू भूक वाढत जाऊन जेवण वाढविणे हे आवश्यक आहे.

व्यवस्थित झोप घेणे. – रोज व्यवस्थित आहार घेतल्याने शक्ति मिळते. परंतु शारिरीक मानसिक कष्टांमुळे शक्तीचा व्यय होतो त्यामुळे आराम आवश्यक आहे.

मनाने प्रसन्न व आनंदी राहणे – क्रोध चिंता कृशता आणणारे आहे. त्यामुळे या कारणांनी जर कृशता असेल तर मन रमविणे, प्रसन्न आनंदी करणाऱ्या गोष्टी करणे.

आहारात मांसाहारी व्यक्तींनी ग्राम्य व जलेचर प्राण्यांचे मांसरस ( सूप) घेणे. हिंग मिरे सुंठ इ. तिखट मसाल्यांनी फोडणी दिलेले मांस मासे सेवन करणे.

 • आहार हलका व पोटभर घेणे आवश्यक आहे.
 • जेवणात तूप दूध भात पोळी गव्हाचे पदार्थ.
 • साखर गुळाचे गोड पदार्थ उदा. खीर, दलिया खीर इ. घेणे.
 • अंगाला तेलाने मालिश करणे हलका व्यायाम. – यामुळे मांसपेशी पुष्ट होतात. शरीर स्निग्ध राहते.
 • रोज दूध युक्त उटणे लावून स्नान करणे, सुगंधी अत्तर लावणे. या गोष्टी मनाला प्रसन्न करणाऱ्या आहेत.
 • च्यवनप्राश सारखे रसायन घेणे.
 • खजूर, काळ्या मनुका, कोकम सरबत, आवळा खाणे.
 • काही त्रास आजार असतील त्यानुसार चिकित्सा घेणे. बस्ति पंचकर्म, शतावरी अश्वगंधा इ. औषधांचा विचार रुग्ण प्रकृती व लक्षणानुसार होतो. उदा. जंताचा त्रास असेल तर त्याची चिकित्सा आवश्यक आहे.
 • याप्रमाणे कृशतेचा विचार आयुर्वेदाने केला आहे.
 • स्थूलता जसा चुकीच्या लाईफ स्टाईल मुळे उत्पन्न होतो तसेच कृशतेचेही आहे. त्यामुळे आहार विहार महत्त्वाचा.
 • योग्य आहार भूक लागल्यावर पौष्टीक, ताजे, दूध तूप युक्त जेवण व शारीरिक मानसिक आराम या गोष्टी कृशता दूर करणाऱ्या आहेत. व्यक्तीपरत्त्वे कारणं वेगवेगळी असतात त्यानुसार बदल करणे आवश्यक आहे. ना स्थूल ना अति कृश हे स्वस्थ शरीराचे लक्षण आहे. त्यामुळे असे लक्षण असल्यास वेळीच उपचार काळजी, कारणांचा त्याग करणे आवश्यक आहे.

 

 

 

 

 

 

 

ही बातमी पण वाचा : अतिकृशता – वेळीच लक्ष देणे गरजेचे !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER