चोरट्यांनी त्रेपन्न हजाराच्या दागिन्यांची पर्स लांबविली.

सांगली : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी 53 हजार रुपयांचे दागिने असलेली पर्स पळविली आहे. हा प्रकार कुपवाडमधील रोहिदासनगरमधील महादेव मंदीरानजिक राहणार्‍या मनीषा संजय व्हनकडे यांच्या घरात घडला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित असलेल्या मनीषा व्हनकडे यांच्या घराचा दरवाजा रविवारी दुपारच्या सुमारास उघडा होता. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने घरात घुसून सोन्याच्या बांगड्या, कर्णफुले, अंगठ्या असा ऐवज असलेली पर्स पळविली. दागिने असलेली पर्स गायब असल्याचे लक्षात येताच मनीषा व्हनकडे यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेऊन चोरीची फिर्याद दिली आहे.