थीम व मेद्वेदेवचा पराक्रम, एकाच स्पर्धेत दोन वेळा हरवले जोकोवीच व नदालला

Thiem and Medvedev beat Djoko and Nadal Twice

लंडन :  जागतिक क्रमवारीतील क्रमाने पहिले चार खेळाडू वर्षअखेरची सर्वात महत्त्वाची टेनिस (Tennis) स्पर्धा एटीपी फायनल्स (ATP Finals) च्या उपांत्य फेरीत पोहोचले होते, पण त्यापैकी टॉप दोघांना तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूंना बाद करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

तिसऱ्या क्रमांकाच्या डाॕमिनीक थीमने (Dominic Thiem) नंबर वन नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic) ला 7-5, 6-7 (10), 7-6 (5) अशी कडव्या संघर्षात मात दिली तर चौथ्या क्रमांकाच्या दानिल मेद्वेदेवने (Daniil Medvedev) दुसऱ्या क्रमांकाच्या राफेल नदालचे (Rafael Nadal) चे आव्हान 3-6, 7-6 (4), 6-3 असे संपवले.

याप्रकारे यंदा एटीपी फायनल्सच्या विजेतेपदासाठी आता डॉमिनीक थीम व दानिल मेद्वेदेव या नव्या पिढीच्या खेळाडूंमध्ये लढत होणार आहे आणि 50 वर्षांच्या या स्पर्धेच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच सलग सहाव्या वर्षी नवा चेहरा विजेता ठरणार आहे. ही स्पर्धा 2015 मध्ये जोकोवीचने, 2016 मध्ये अँडी मरे, 2017 मध्ये ग्रिगोर दिमीत्रोव्ह, 2018 मध्ये अॕलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि गेल्या वर्षी स्टेफानोस सिसीपासने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आता थीम वा मेद्वेदेव यापैकी कुणीतरी विजेता होईल आणि सलग सहाव्या वर्षी एटीपी फायनल्सचा विजेता म्हणून वेगळ्या खेळाडूचे नाव लागेल. या स्पर्धेच्या इतिहासात याच्याआधी 1974 ते 1979 मध्ये असे घडले होते.

थीम व मेद्वेदव यांचे हे विजय म्हणजे व्यावसायिक टेनिसमध्ये आता नव्या दमाचे खेळाडू लवकरच फेडरर-नदाल-जोकोवीच या त्रिमूर्तीची जागा घेतील याचेच चिन्ह आहे कारण याच स्पर्धेच्या आधीच्या साखळी सामन्यात थीमने नदालला आणि मेद्वेदेवने जोकोवीचला मात दिली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी प्रतिस्पर्धी बदलले असले तरी सामन्याचा निकाल बदलू दिलेला नाही. याप्रकारे एकाच स्पर्धेत नदाल व जोकोवीच यांना प्रत्येकी दोन वेळा पराभूत करण्याचा वेगळाच विक्रम थीम व मेद्वेदेव यांनी केला आहे.

थीम हा सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. योगायोगाने त्याने ज्याचे आव्हान संपवले तोच जोकोवीच त्याच्याआधी सलग चार वर्षे (2012 ते 16) अंतिम फेरीत पोहोचला होता.

दुसऱ्या सेटच्या टाय ब्रेकरमध्ये थीमला चार मॕचपाॕईंट मिळाले होते पण त्याला तिथेच सामना संपविण्यात अपयश आले पण तिसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्येही त्याने नेटाने आपली बाजू लावून ठेवत कारकिर्दीतील 300 वा विजय मिळवला. जोकोवीचविरुध्दचा त्याचा हा पाचवा विजय होता. यासह जोकोवीचचा सहा वेळा ही स्पर्धा जिंकून फेडररच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी हुकली.

दुसारीकडे राफेल नदालची एटीपी फायनल विजेतेपदाची प्रतिक्षा दानिल मेद्वेदेवने आणखी एक वर्ष लांबवली आहे. 20 ग्रँड स्लॕम स्पर्धा विजेता नदाल एकदासुध्दा ही स्पर्धा जिंकू शकलेला नाही. मात्र गेल्या वर्षी या स्पर्धेच्या पदार्पणात एकही सामना जिंकू न शकलेल्या मेद्वेदेवने यंदा जोकोवीच व नदालला मात देत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

उपांत्य सामन्यात पहिला सेट जिंकल्यावर दुसऱ्या सेटमध्येच नदालला सामना संपवायची संधी होती. 6-3, 5-4 असा नदाल सामना जिंकण्यासाठी सर्व्हिस करत होता पण तिथून मेद्वेदेवने सामन्याला कलाटणी दिली आणि पहिला सेट जिंकल्यावर सलग 71 सामने जिंकण्याचा नदालचा पराक्रम धुळीस मिळाला. दुसरीकडे मेद्वेदेवने सलग नववा विजय नोंदवला.

गेल्या वर्षी याच स्पर्धेत मेद्वेदेवने नदालविरुध्द मॕचपॉईंट व तिसऱ्या सेटमध्ये 5-1 अशा आघाडीवरुन सामना गमावला होता मात्र आताचा मेद्वेदेव हा वर्षभरापूर्वीच्या मेद्वेदेवपेक्षा फार वेगळा असल्याचे त्याने नदालला दाखवून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER