
माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) …जगातील सर्वोच्च शिखर! ते सर करता यावं हे प्रत्येकच गिर्यारोहकाचे (Climbers) स्वप्न असते. कितीतरी जण त्यासाठी जीव धोक्यात घालत असतात, पण त्यापैकी फारच थोड्या लोकांचे स्वप्न साकार होत असते. यापैकी दोन महाभाग असे निघाले आहेत की त्यांनी माऊंट एव्हरेस्ट ‘सर’ न करताच हे सर्वोच्च शिखर ‘सर’ केल्याचा दावा केला आहे. त्यांची लबाडी आता उघड झाली आहे. नरेंद्रसिंग यादव (Narender singh Yadav) व सीमारानी गोस्वामी (Seema rani Goswami) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी 2016 मध्ये एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केल्याचा दावा केला होता मात्र तेंव्हाही त्यांच्या या दाव्यावर स्थानिक शेर्पा व इतरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यापैकी नरेंद्रसिंग यादव याला साहसी खेळांसाठी देण्यात येणारा तेनझिंग नोर्गे पुरस्कार जाहिर झाला होता पण या संशयामुळे तो त्याला अद्याप प्रदान करण्यात आलेला नाही.
यादव व गोस्वामी यांनी एव्हरेस्टच्या शिखरावर पोहचल्याच्या पुष्टी म्हणून काही छायाचित्रै सादर केली होती आणि त्याआधारे नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना एव्हरेस्ट सर केल्याचे प्रमाणपत्र दिले होते पण अनुभवी गिर्यारोहकांनी त्या छायाचित्रातील लबाडी पकडली होती. त्या फोटोमध्ये आॕक्सिजन मास्क तर दिसत होता पण तो आॕक्सिजनच्या टाकीला जोडणारी नळी दिसत नव्हती. बर्फाचे प्रतिबिंब व परावर्तीत किरण दिसत नव्हते, त्या गिर्यारोहकांच्या चष्म्यात बर्फ वा पर्वताचे प्रतिबिंब दिसत नव्हते आणि जोरदार वाऱ्यांच्या ठिकाणी न फडकते झेंडे बघूनच संशय आला होता. ती छायाचित्रे छेडछाड केलेली होती आणि फोटोंप्रमाणेच चढाईसुध्दा बनावट होती हे आता समोर आले आहे. चौकशीत ही छायाचित्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर आता नेपाळी अधिकारी या दोघा भारतीय गिर्यारोहकांवर बंदी घालायचा विचार करत आहेत. या दोघांनी माऊंट एव्हरेस्टशिवाय आणखी 10 शिखरांवर चढाई केल्याचा दावा केलेला आहे. त्याबद्दलही आता संशय आहे.
यादव व गोस्वामी हे दोघे हरियाणाचे आहेत आणि यशस्वी गिर्यारोहक म्हणून त्यांनी ओळख मिळवली आहे. त्यांच्यासंदर्भात नेपाळी पर्यटन अधिकारी प्रदीपकुमार कोईराला यांनी म्हटलेय की, त्यांच्या एव्हरेस्ट चढाईची खात्री पटू शकलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. कोईराला यांनीच या दोघांच्या संशयास्पद चढाईची गेल्या आॕगस्टपासून चौकशी केली आहे.
यादवने मात्र हे आरोप फेटाळून लावले असून आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचे म्हटले आहे. त्याने उलट आपल्या नेपाळी गाईडविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्याने म्हटलेय की, या गाईडनेच ही दिशाभूल करणारी माहिती पसरवली आहे. सीमा रानी गोस्वामीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला