दे आर इन्स्पायर्ड, त्यातून घडावेत न्यूटन, एडिसन

science and technology

Shailendra Paranjapeतरुणांच्या ओठावरची गाणी सांगा, मी तुम्हाला त्या राष्ट्राचं भवितव्य काय हे, हे सांगतो, अशा आशयाच्या पंक्ती एक कवीनं लिहून ठेवल्या आहेत. तरुणांच्या विचारानंच समाज बदलू शकतो. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर ही तीच गोष्ट वेगळ्या शब्दात सांगत. ते म्हणत की पस्तिशीच्या आतले तरुणच देश बदलू शकतील, समाज बदलू शकतील. हे आठवण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर नवसंशोधनाच्या प्रकल्पांद्वारे मिळवलेलं यश.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेल्या तीन-चार दशकात झालेल्या प्रगतीमुळे मानवी जीवन आमूलाग्र बदलून गेले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाट्स अँप तर सोडाच पण आमच्या काळात मोबाइल फोन, संगणक किंवा कॉम्प्युटर, इंटरनेट, रंगीत टीव्हीही नव्हते, असं सांगितलं तर आजच्या पिढीला ते खरंही वाटत नाही.

विज्ञान-तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे, नवनव्या शोधांमुळे आणि त्यांच्या आविष्कारस्वरूप आज सहजी उपलब्ध झालेल्या सर्व साधनांमुळे जगणं सुसह्य, सोपं झालं आहे. अगदी मोबाईलवर एक बटण दाबून वाटेल ती आणि वाट्टेल ती वस्तू, पदार्थ घरी मागवता येतो, पैसेही ट्रान्स्फर करता येतात आणि अगदी विमान, मोटारच नाही तर एसटी किंवा खासगी बसची तिकीटही बुक करता येतं. मोबाईलच्या कँमेऱ्यातून सुदूर अंतरावरून घराकडे, आस्छापनेकडे लक्षही ठेवता येतं. नोकर, कामगार किंवा घरात काम करणारेही वेळेवर आलेत की नाही, त्यांनी दारं उघडी ठेवलीत का, हे सारं बघता येतं.

विज्ञान-तंत्रज्ञानातल्या प्रगतीत नवनवोन्मेषशाली आविष्कार घडवण्यासाठी तरुण प्रज्ञावंत प्रतिभावंत मोलाचं योगदान देऊ शकतात. त्यामुळेच केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयानं इन्स्पायर अँवॉर्ड्स द्यायला सुरुवात केलीय. हे पुरस्कार शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना दिले जातात आणि ते देताना विद्यार्थ्यांच्या प्रकल्पातून सामाजिक समस्येचं निराकरण होतंय का, हे तपासलं जातं. विशेष म्हणजे यंदा महाराष्ट्रातल्या तीन हजारहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले आहेत आणि पुण्यातल्या दोनशेहून जास्ती जणांचा त्यात समावेश आहे.

राष्ट्रीय पातळीवरचे संशोधक आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वि. ग. भिडे यांना शालेय विद्यार्थ्यांमधल्या संशोधकवृत्ती जोपासली जायला हवी, असं कळकळीनं वाटायचं. त्यासाठी त्यांनी भारतीय विद्या भवनच्या विज्ञान शोधिका या प्रकल्पाला सुरुवात केली होती. तसंच राष्ट्रीय पातळीवर भरणाऱ्या सायन्स कॉँग्रेसमधे अखिल भारतीय विज्ञान अधिवेशनाच्या वेळीच शालेय विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय पातळीवरून निवडलेल्या सर्वोत्तम प्रकल्पांचं प्रदर्शन भरवून त्यांचं छोटेखानी अधिवेशनही बालवैज्ञानिक मेळावा म्हणून भरवण्याची सुरुवातही भिडेसरांनी केली होती. त्यातलं पहिलं अधिवेशन पुण्यात २००० साली झालेल्या सायन्स कॉँग्रेसच्या वेळी झालं होतं आणि त्यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिवंगत खगोल वैज्ञानिक प्रा. डॉ. गोविंद स्वरूप यांनी त्या अधिवेशनाचं उद्घाटन केलं होतं आणि मुख्य सायन्स कॉँग्रेसचं अध्यक्षपद देशतल्या पेटंट साक्षरता मोहिमेचे जनक असलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी भूषवलं होतं.

एका पहिली दुसरीतल्या मुलानं गोविंद स्वरूप यांना एक प्रश्न विचारला होता की हे ग्रह तारे आकाशगंगा हे सारं आहे पण मुळात हे सगळं तुम्हाला कसं कळतं… डोकं खाजवत स्वरूप सरांनी उत्तर दिलं होतं, अरे बाबा, हे सगळं माणसाला कसं कळतं, याचा शोध तर सगळं जग घेतंय. माणसाच्या आकलनक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी आता अनेक प्रकारचं शिक्षण उपलब्ध झालंय. पण विश्वाच्या उत्पत्तीचा शोध घेण्यापासून ते निसर्ग जाणून घेताना आणि निसर्गाबरोबर साहचर्याने राहण्यासाठी, रोजचं जगणं सोपं करण्यासाठी तरुण प्रज्ञावंतच योगदान देऊ शकतात. त्यांनी ते शालेय वयातच दिलंय. आता खरी गरज आहे ती हे सारे प्रज्ञावंत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राहतील हे बघण्याची आणि त्यांच्या नवनव्या तंत्रज्ञानरूपी आविष्कारांतून समाज, राज्य आणि देश जगात मोठे होतील, असं योगदान देण्यासारखं वातावरण त्यांना मिळण्याची.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER