हे असतील धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश, दर्शनाबाबतचे नियम

Religious places - CM Uddhav Thackeray
  • अखेर उघडणार मंदिराची दारे
  • धार्मिक स्थळे सोमवारपासून खुली करण्याची घोषणा

मुंबई : विविध संघटना, संतमहंतांनी दबाव आणल्यानंतर आणि लाखो भक्तांनी केलेल्या मागणीनंतर आता राज्यातील धार्मिक स्थळे (Religious places) सोमवारपासून (दि.१६) उघडली जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी याबाबतची घोषणा केली. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश, पूजा याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचनांनुसार भक्तांना मूर्ती, पुतळे वा धार्मिक ग्रंथांना स्पर्श करता येणार नाही, म्हणजे हात लावून नमस्कार करता येणार नाही. विशिष्ट अंतर राखूनच दर्शन घ्यावे लागेल.

धार्मिक स्थळं उघडण्याची वा बंद करण्याची वेळ सगळ्यांसाठी सारखी नसेल. धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन ठरवेल त्या वेळेनुसार ती उघडी राहतील. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन व्यवस्थापन त्याचा निर्णय करेल.

कंटेन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळात जाताना मास्क घालणे, सॅनिटायजर/हँडवॉशचा वापर, थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था अनिवार्य असेल. तसेच संबंधित धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन सुरक्षिततेच्या दृष्टीने काही नियम लागू करू शकतील. स्थानिक स्वराज्य संस्था, मंदिर व्यवस्थापन यांच्या समन्वयातूनही काही नियम लागू होऊ शकतील.

धार्मिक स्थळात कोरोनाचा (Corona) रुग्ण किंवा कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना तत्काळ विलगीकरणात ठेवावे. त्या धार्मिक स्थळाचे तत्काळ निर्जंतुकीकरण करावे. अशा रुग्णांबाबतची माहिती संबंधित आरोग्य यंत्रणेला तत्काळ द्यावी लागेल, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

धार्मिक स्थळांमध्ये जाताना किमान सहा फुटांचे अंतर दोघांमध्ये राहायला हवे. ही जबाबदारी संबंधित व्यवस्थापनांची असेल. ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत त्यांनाच प्रवेश असेल. कोरोनाबाबत जनजागृतीचे पोस्टर्स लोकांना सहज दिसतील अशा ठिकाणी व्यवस्थापनांना लावावे लागेल. धार्मिक स्थळाचे आकारमान लक्षात घेऊन एकावेळी किती जणांना आत प्रवेश द्यायचा याबाबतचा निर्णय स्थानिक प्राधिकारी आणि व्यवस्थापन दोघांमिळून घेतील. पादत्राणे शक्यतो गाडीतच ठेवून धार्मिक स्थळात प्रवेश करावा, ते शक्य नसेल तर धार्मिक स्थळात एका बॉक्समध्ये एकच पादत्राण ठेवता येऊ शकेल.

धार्मिक स्थळातील वा लगतची दुकानांमध्येही शारिरिक अंतर राखावेच लागेल. प्रवेशापूर्वी हात आणि पाय धुवावे लागतील. वातानुकूलित व्यवस्था ठेवता येईल; पण त्याचे तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सिअस एवढेच ठेवावे लागेल. धार्मिक स्थळात प्रवेशासाठी जी रांग असेल त्यातही दोघांमध्ये पुरेसे अंतर राखावे लागेल. धार्मिक स्थळात प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग शक्यतो वेगवेगळे असतील. धार्मिक स्थळांमध्ये रेकॉर्डेड गाणी, भजन, धार्मिक वचन लावता येतील. प्रत्यक्ष गायक कलावंतांना गाणी, भजने, प्रवचने करण्यास मनाई राहील. प्रार्थनेसाठीची सतरंजी, चटई ही सर्वांसाठी एकच नसेल, भक्तांना ती स्वत:ला पुरेल एवढी सोबत आणावी लागेल. प्रसादाचे वाटप, पवित्र जल शिंपडणे यास मनाई असेल. धार्मिक स्थळात अन्नदान करणाऱ्या संस्थांनाही शारीरिक अंतराची व्यवस्था ठेवावी लागेल.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER