2021 मध्ये या नवीन जोड्या दिसणार पडद्यावर

2021 मध्ये या नवीन जोड्या दिसणार पडद्यावर

बॉलिवुडमध्ये (Bollywood) ज्या नायक-नायिकेच्या जोड्या प्रेक्षकांना आवडतात त्यांना घेऊन ज्याप्रमाणे निर्माते सिनेमे बनवतात. त्याचप्रमाणे नायक-नायिकांच्या नवीन नवीन जोड्या बनवून त्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्नही काही निर्माते करीत असतात. यात थोराड नायकांना नवीन दमाच्या ताज्या अभिनेत्रीबरोबर काम करायला जसे लावतात तसेच पूर्वी एकत्र न आलेल्या नायक-नायिकांनाही पडद्यावर आणून एक वेगळी जोडी प्रेक्षकांपुढे आणण्याचा प्रयत्नही निर्माते करीत असतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु असून पुढील वर्षीही हीच परंपरा सुरु राहाणार आहे. पुढील वर्षी रुपेरी पडद्यावर येणाऱ्या नवीन जोड्यांवर एक नजर-

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि प्रभास (Prabhas) हे सध्याचे अत्यंत यशस्वी नायक-नायिका आहेत. प्रभास दक्षिणेत प्रचंड यशस्वी असून त्याने बॉलिवुडमध्येही चांगले नाव कमवलेले आहे. दीपिकाने बॉलिवुडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे. या दोघांची जोडी पडद्यावर येणे म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरेल असे वाटल्याने या दोघांना दक्षिणेतील प्रख्यात दिग्दर्शक नाग अश्विनने एका प्रोजेक्टसाठी एकत्र आणले आहे. हा एक साय-फाय सिनेमा असून यात अमिताभ बच्चन यांचीही महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे या सिनेमाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. हा सिनेमा तामिळ. तेलुगुसह हिंदीमध्येही तयार होणार असून संपूर्ण जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

एकीकडे दीपिका पदुकोण प्रभाससारख्या सुपरस्टार नायकाबरोबर काम करीत असतानाच दुसरीकडे ती सिद्धांत चतुर्वेदी या नवीन नायकासोबतही दिसणार आहे. दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांना दिग्दर्शक शकुन बात्राने त्याच्या नव्या सिनेमासाठी साईन केले असून या सिनेमाचे शूटिंगही सुरु करण्यात आले आहे. शकुन बात्राचा हा सिनेमा एका वेगळ्या जॉनरचा असून यात दीपिका आणि सिद्धांतच्या अत्यंत वेगळ्या भूमिका आहेत.

सिद्धांत चतुर्वेदी एकीकडे दीपिकासोबत काम करीत असतानाच त्याला कॅटरीना कैफसोबतही काम करण्याची संधी मिळाली आहे. कॅटरीना कैफ (Katrina Kaif) आणि सिद्धांत चतुर्वेदी– या दोघांची जोडी एक सुपरनॅचरल कॉमेडी ‘भूत पोलीस’मध्ये एकत्र आणण्यात आली आहे. या सिनेमात हे दोघेही भूताच्या रुपात दिसणार आहेत. तसेच या सिनेमात सैफ अलीचीही महत्वाची भूमिका आहे. फॉक्स स्टार या सिनेमाची निर्मिती करीत असून दिग्दर्शन पवन कृपलानी करणार आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या चांगलाच हॉट असून अनेक सिनेमे त्याच्याकडे आहेत. जवळ जवळ सर्व मोठ्या नायिकांसोबत काम केलेला रणबीर कपूर एकीकडे आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) ब्रह्मास्त्र करीत आहे. त्याचबरोबर त्याची जोडी आता श्रद्धा कपूरसोबतही पडद्यावर दिसणार आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरला (Shraddha Kapoor) दिग्दर्शक लव रंजन पहिल्यांदाच एकत्र आणत आहे. लव रंजनचा हा सिनेमा एक रोमाँटिक कॉमेडी असून रणबीर आणि श्रद्धा रोमांस करता करता प्रेक्षकांना हसवण्याचे काम करणार आहेत. श्रद्धाने आजवर अशी भूमिका केलेली नाही.

रणबीर कपूरबरोबरच रणवीर सिंहही (Ranveer Singh) बॉलिवुडमध्ये यशस्वी नायक म्हणून ओळखला जात आहे. रणवीरनेही सर्व मोठ्या नायिकांसोबत काम केले असून तो पुढील वर्षी जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे या दोघींसोबत दिसणार आहे. रणवीर सिंह, जैकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे या तिघांना प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीने (Rohit Shetty) त्याच्या ‘सर्कस’ सिनेमासाठी साईन केलेले आहे. हा एक कॉमेडी सिनेमा असून, तिघेही कलाकार प्रचंड उत्साही असल्याने सिनेमातही त्यांचा हा उत्साह नक्कीच दिसेल असे बॉलिवुडमध्ये म्हटले जात आहे.

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हा दक्षिणेतील सुपरस्टार आहे. त्याने अनेक हिट सिनेमे दिले असून तो आता एका नव्या अॅक्शनपटात दिसणार आहे. हा सिनेमा तामिळसह हिंदीमध्येही तयार केला जाणार आहे. या सिनेमासाठी प्रथमच विजय देवरकोंडा आणि बॉलिवुडमधील नवी नायिका अनन्या पांडे (Ananya Panday) यांची जोडी बनवण्यात आलेली आहे. ही जोडी प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.

नेहमीप्रमाणे अक्षयकुमारचेही (Akshay Kumar) पुढील वर्षी सात ते आठ सिनेमे प्रदर्शित होण्याची शक्यता असून त्यातील रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी हा सर्वप्रथम प्रदर्शित होणार आहे. अक्षयच्या नव्या सिनेमांपैकी एक सिनेमा आहे अतरंगी रे. या सिनेमात प्रथमच अक्षयकुमार आणि सारा अली खान (Sara Ali Khan) एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात रजनीकांतचा जावई धनुषही महत्वाची भूमिका साकारीत आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन आनंद एल. राय करीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER