
सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवुडमध्ये (Bollywood) नेपोटिझमची चर्चा जोरदारपणे सुरु झाली होती. बॉलिवुडमध्ये यशस्वी असलेल्या कलाकारांच्या मुलांना ताबडतोब संधी मिळते तर नव्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. प्रत्येक वर्षी स्टार किड्स ज्याप्रमाणे रुपेरी पडद्यावर येतात त्याचप्रमाणे संघर्ष करून अनेक नवे चेहरेही पडद्यावर येतात. 2021 ही त्याला अपवाद नाही. यावर्षीही अनेक स्टार किड्ससह नवे चेहरे रुपेरी पडद्यावर नायक-नायिका म्हणून दिसणार आहेत. 2021 मधील नव्या चेहऱ्यांवर एक नजर-
या यादीत सगळ्यात वर नाव घ्यावे लागेल अहान शेट्टीचे. अहान हा प्रख्यात अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आहे. सुनील शेट्टीची मुलगी अथिया अगोदरच नायिका म्हणून बॉलिवुडमध्ये काम करू लागलेली आहे. आता अहानही नायक म्हणून रुपेरी पडद्यावर येणार आहे. अहानला लाँच करण्याची जबाबदारी साजिद नाडियाडवालाने शिरावर घेतली आहे. साजिदनेच टायगर श्रॉफलाही लाँच केले होते. साजिद नाडियाडवाला हिट तेलगु सिनेमा ‘आरएक्स 100’ ची हिंदी रिमेक करीत असून या सिनेमाचे नाव ‘तडप’ ठेवण्यात आलेले आहे. या सिनेमात अहान नायक असून त्याच्या नायिकेची भूमिका तारा सुतारिया साकारत आहे. हा सिनेमा यावर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.
अहानप्रमाणेच मिथुनचा दुसरा मुलगा नामाशी चक्रवर्तीही यावर्षी रुपेरी पडद्यावर येणार आहे. नामाशी ‘बॅड बॉय’ सिनेमातून नायक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नामाशीचे नशीब खूप चांगले आहे. कारण त्याच्या या पहिल्या सिनेमाचे दिग्दर्शन प्रख्यात यशस्वी दिग्दर्शक राजकुमार संतोषी करीत आहे. या सिनेमात नामाशीच्या नायिकेची भूमिका साकारत आहे अमरिन कुरैशी.
छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी यावर्षी नायिका म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पलकला लाँच करीत आहे विवेक ओबेरॉय. विवेक ओबेरॉय सत्य घटनेवर आधारित रोजी: द सॅफ्रॉन चॅप्टर सिनेमा तयार करीत असून यात पलक मुख्य भूमिका साकारणार आहे. विवेक ओबेरॉयही या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे. सिनेमाचे शूटिंग सुरु करण्यात आलेले आहे.
मिस वर्ल्ड, मिस इंडिया, मिस यूनिव्हर्स झाल्यानंतर बॉलिवुडमध्ये त्यांनी येणे अलिखित नियम आहे. ही परंपरा मानुषी छिल्लर यावर्षी कायम ठेवणार आहे. मानुषी 2017 मध्ये मिस वर्ल्ड झाली पण सिनेमात यायला तिला चार वर्षे लागली आहेत. यशराज अक्षयकुमारला घेऊन ऐतिहासिक ड्रामा ‘पृथ्वीराज’ तयार करीत आहे. या सिनेमात अक्षयकुमारची नायिका म्हणून मानुषीला साईन करण्यात आलेले आहे.
दुसऱ्या भाषेतील लोकप्रिय नायिकाही देशभरात लोकप्रिय होण्यासाठी हिंदी सिनेमात काम करण्यासाठी मुंबईला येतात. या परंपरेनुसार शालिनी पांडे ही बॉलिवुडमध्ये यावर्षी एंट्री करीत आहे. शालिनीने 2017 मध्ये तेलुगु सिनेमा अर्जुन रेड्डी मध्ये काम केले होते. हा सिनेमा हिट झाला होता आणि शालिनी प्रचंड लोकप्रिय झाली. शालिनी पांडे बॉलीवुडमध्ये जयेशभाई जोरदार सिनेमात रणवीर सिंहची नायिका म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
साऊथची आणखी एक नायिका यावर्षी बॉलिवुडमध्ये प्रवेश करणार आहे आणि ती आहे प्रणिता सुभाष. प्रणिता साऊथची अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी नायिका आहे. प्रणिताला बॉलिवुडमध्ये प्रख्यात दिग्दर्शक प्रियदर्शन घेऊन येत आहे. प्रियदर्शनने त्याचा हिट सिनेमा हंगामाचा पुढील भाग हंगामा 2 बनवण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमात शिल्पा शेट्टी, परेश रावल, मिझान जाफरी काम करणार असून त्यांच्यासोबत प्रणितीही प्रेक्षकांना हसवण्याचे काम करणार आहे.
रश्मिका मंदानाही साऊथमधील यशस्वी आणि प्रचंड लोकप्रिय नायिका आहे. रश्मिकाला आपल्या सिनेमात घेण्यासाठी अनेक मोठे निर्माते तयार आहेत. रश्मिका बॉलिवुडमध्ये ‘मिशन मजनू’ सिनेमातून एंट्री करणार आहे. यात तिचा नायक सिद्धार्थ मल्होत्रा आहे. या सिनेमाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि अमर बुटाला करीत आहेत. याशिवाय रश्मिका विकास बहलच्या डेडली सिनेमातही काम करणार आहे. खरे तर या सिनेमासाठी कॅटरीना कैफ आणि कृती सेननच्या नावांचा विचार सुरु होता. अखेर हा सिनेमा रश्मिकाच्या झोळीत पडला आहे. विशेष म्हणजे या सिनेमामुळे तिला सुपरस्टार अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
अमेझॉन प्राईमवरील कबीर खान निर्मित वेब सीरीज ‘द फॉरगॉटन आर्मी -आझादी’ मध्ये शर्वरी वाघने काम केले होते. तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती. वेबसीरीजमधून शर्वरी आता थेट यशराजच्या बंटी और बबली 2 मधून बॉलिवुडमध्ये एंट्री करणार आहे. पहिल्याच सिनेमात शर्वरीला सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
याशिवाय आणखी काही नवे चेहरेही यावर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतात. त्यांची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देऊच.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला