या चित्रपटांनीही मारली बुसानपर्यंत मजल

Busan Film Festival.jpg

बुसान फिल्म फेस्टीव्हल म्हणजे जगभरातील सिनेप्रेमींचे लक्ष असलेला मेळा. या फिल्म फेस्टीव्हलमध्ये चित्रपटाची निवड होणे फार बहुमानाचे मानले जाते. यंदाच्या बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या मराठी दिग्दर्शकाच्या चैतन्य ताम्हणेच्या ‘द डिसायपल’  सोबत सात आणखी भारतीय चित्रपटांचा समावेश करण्यात आलेला आहे. चैतन्याच्या ‘द डीसायपल ‘ या चित्रपटाने नुकत्याच झालेल्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये चांगलीच दौड मारली होती. या चित्रपटाला ‘प्रिफिक्स वर्ड क्रिटिक्स अवॉर्ड’ आणि ‘सर्वोत्कृष्ट पटकथा’ असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. बुसान फिल्म फेस्टीव्हलमध्ये जात असून विविध पुरस्कारासाठी त्यांचे नामांकनही झाले आहे. २१ ते ३० ऑक्टोबर दरम्यान दक्षिण कोरियात आयोजित होणाऱ्या बुसान चित्रपट महोत्सवात जाणाऱ्या भारतीय  चित्रपटांवर एक नजर.

‘पिंकी एली’ हा कन्नड भाषेतील चित्रपट असून त्याचे दिग्दर्शक पृथ्वी कोणाऊर आहेत. हा चित्रपट नोकरदार महिलेच्या जीवनातील घटनांवर आधारित आहे. कामावर जाणारी बिंदुश्री नावाची ही महिला आपल्या लहान मुलीला मोलकरणीकडे सोडते. परंतु मोलकरीण त्या मुलीचा कसा गैरवापर करते ते यात प्रामुख्याने दाखवले आहे. एवढेच नव्हे तर या लहान मुलीला स्टेशनवर भिक मागण्यासही लावले जाते. आपल्या या हरवलेल्या मुलीला ही महिला कशी शोधते ते या चित्रपटात  दाखवण्यात आले आहे.

या यादीतील दुसरा चित्रपट आहे ‘मिल पत्थर’. हा चित्रपट ईवान अय्यर यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटाला होरायझन सेक्शनमध्ये पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या चित्रपटात एका ट्रक चालकाची कथा सांगण्यात आलेली आहे.

या यादीतील तिसरा चित्रपट मराठी असून त्याचे नाव ‘बिटर स्वीट’ असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले असून हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यात विशेषतः बीडमध्ये श्रमिक महिलांना गर्भपात करावयास लावून त्यांचे कसे शोषण केले जाते ते या चित्रपटात अनंत महादेवन यांनी मांडले आहे. हा चित्रपट जिसूएक पुरस्कारासाठी नामांकित झाला आहे.

या यादीत इमरान हाशमी अभिनित ‘हरामी’ या चित्रपटाचाही समावेश आहे.  शाम मदीराजू दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती इंडो अमेरिकन प्रोडक्शन यांनी केली आहे. या चित्रपटालाही न्यू होरायझन विभागात पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. या चित्रपटात झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुणांच्या गुन्हेगारीची कथा मांडण्यात आलेली आहे.

यासोबतच कॅप्टीव्ह हा हिंदी चित्रपटही पुरस्काराच्या यादीत आहे. सुमन मुखोपाध्याय यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट बंगाली लेखिका आशापूर्णा देवी यांनी लिहिलेल्या लघुकथेवर आधारित आहे.

या यादीत सुधीर मिश्रा यांनी निर्मित केलेला आणि गनी यांनी दिग्दर्शित केलेला मॅटोज बायसिकल’ हा चित्रपटलाही नामांकन मिळाले आहे.  विंडो ऑन एशियन सिनेमा श्रेणीत या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे.  प्रख्यात निर्माता दिग्दर्शक  प्रकाश झा यांनी चित्रपटात अत्यंत महत्वाची भूमिका साकारली आहे. नवीन सायकल विकत घेण्यासाठी एका कुटुंबाला काय काय आणि कशी कशी धडपड करावी लागते ते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

याशिवाय कयाट्टम हा मल्याळी भाषेतील चित्रपटही आहे. सनल कुमार सासिधरन दिग्दर्शित या चित्रपटचा जागतिक प्रीमियर या फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात येणार आहे.

चैतन्य ताम्हणेचा द डीसायपल हासुद्धा चित्रपट या फिल्म फेस्टीव्हल मध्ये दाखवला जाणार आहे.एकूणच भारतीय चित्रपटांनी यंदा बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये चांगलीच मजल मारल्याचे दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER