हेही दिवस जातील !

हे ही दिवस जातील

सविता माझी बालमैत्रीण. मुख्य म्हणजे दोघींचीही लग्न होऊन अनेक वर्षे उलटली तरी आमची मैत्री कायम आहे. फक्त मध्यंतरीच्या काळात संसारात अडकल्यानं जाणं-येणं कमी झालं होतं एवढंच. पण आता फोनमुळे तसा संपर्क राहतोच. निदान दोन-चार दिवसांत आमचा फोन होतो. आता दोघींचीही मुले मोठी झाली, दोघीही संसारात स्थिरावलो. मुख्य म्हणजे दोघींच्याही मिस्टरांचे स्वतंत्र व्यवसाय. त्यामुळे समदुःखी. हो ! नवरोबा बाहेर पडले की परत कधी येतील याची फारशी गॅरंटी नसते. एकूणच नोकरीपेक्षा व्यवसायाची सगळी गणितंच वेगळी असतात.

पण एकूण सगळं आलबेल चाललंय. मध्ये आम्ही एका मैत्रिणीकडे जमायचं ठरवलं, अर्थात सोशल डिस्टंसिंग पाळून! मी आवरून तिला घ्यायला तिच्याकडे गेले .मला खात्री होती सविता एकदम तयार होऊन माझी वाट पाहात असेल. पण तिच्याकडे पोचले तर सर्वत्र शांतता दिसली . नाही तर मॅडमची लगबग चाललेली असते. दार लोटलेलं होतं. मी आत गेले तर सविता झोपलेली . तिच्या कामवाल्या मावशीनं सांगितलं, ताईंना बरं नाही. मला बघून सविताला रडूच कोसळलं. मी तिला शांत करून काय झालं म्हणून विचारलं. तसा थोडा व्यवसायावर परिणाम होत असल्याचं मला माहीतच होतं. या कोरोनाच्या काळात एकूणच सगळ्यांचं जे होत आहे, त्यापेक्षा आमचं काही वेगळं नव्हतं .पण मग तिने मला सविस्तर सगळं सांगितलं. तिचे मिस्टर संदीप तसे शांत स्वभावाचे मुळात.

पण अलीकडे त्यांची चिडचिड फार वाढली होती. अगदी बारीकसारीक गोष्टीचा त्यांना राग येई. केव्हा त्यांचे बिनसेल आणि राग कसा निघेल, हे सांगता येत नव्हतं. मुले मोठी कॉलेजला . त्यांच्यावरही वाटेल तसे रागवायचे .या वयाची मुले तशी समजूतदारही होतात; पण आपली चूक नसताना कोणी बोललं तर ऐकून घेऊ शकत नाही. तेवढी मॅच्युरिटी नसते. त्यामुळेही ती चिंतेत होती. व्यवसाय एकदम कमी झालेला .त्यात तेवढ्या कामगारांचे पगार करायचे ,कर्जाचे हप्तेही फेडायचे आणि नुकसान भरून काढत परत सगळं पूर्ववत करणं या सगळ्याचं फार ओझं होतं त्यांना ! अगोदर झालेलं धंद्यातील नुकसान आणि त्यात आणखीन पडलेली या कोरोना संकटाची भर .

हा प्रश्न तसा नवीन नाही .सध्या सगळ्यांना कमी-अधिक फरकाने हा प्रश्न भेडसावतो आहे. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काही लोकांच्या पगारात काही टक्क्यांनी कपात केली आणि व्यवसाय असेल तर विचारूच नका .आपापसातील स्पर्धा वाढली. टिकून राहणेही मोठी परीक्षा ठरतेय . मुख्य म्हणजे व्यवसायात आपल्यावर अनेक कर्मचाऱ्यांची , कामगारांचे कुटुंब आपल्यावर अवलंबून आहे ही काळजीही अप्रत्यक्षपणे संवेदनशील व्यवसायकर्त्यांवर आहेच. पुन्हा या ठिकाणी मैत्रिणीचे मिस्टर हे मुळातच शांत , अबोल आणि अंतर्मुख ! त्यामुळे छोट्या-मोठ्या गोष्टी बोलून शेअर करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. खरे तर बहुतांशी पुरुषांचा हा स्वभाव नसतोच. (याला अपवाद असू शकतात.) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसशास्त्रज्ञ डॉक्टर जॉन ग्रे यांच्या ‘मेन आर फ्रॉम मार्स अँड वूमन आर फ्रॉम वीनस’ या पुस्तकाचे भाषांतर डॉक्टर रमा मराठे यांनी केले आहे.

त्यात त्यांनी सांगितले की, कुठलाही प्रश्न उभा राहिला किंवा समस्या आली तर स्त्रिया या सहसा बोलून मोकळ्या होतात, संवाद साधून त्यावर उपाय शोधतात . याच्या अगदी उलट पुरुष असतात. समोर काही समस्या आली की “ते आपल्या गुहेत जातात” असे त्या म्हणतात. म्हणजे अंतर्मुख होतात. स्वतःच्या कोषात जातात. मनाशीच विचार करतात,अबोल राहतात आणि मग त्यांचाच त्यांना उपाय सापडतो व ते परत पूर्ववत होतात. म्हणजे “आपल्या गुहेतून बाहेर येतात.” स्त्रियांना अशा वेळी वाटतं की पुरुषाला काही अडचण असेल तर त्याला आपण काहीतरी मदत करावी, समजून घ्यावं म्हणून त्या बोलायला जातात. काही अडचण आहे का विचारतात. पण त्याचा उलटाच परिणाम होतो . चिडचिड वाढते.

अशा वेळी डॉ. जॉन ग्रे यांनी सांगितले की, त्यांना एकटं सोडा, “लिव हिम अलोन !” आसपास राहा. पण आपले उद्योग करत राहा. हा एक जनरल उपाय आहे. सगळ्यांनाच लागू होईलच असे नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती ! आपल्या माणसाला आपण जास्त चांगलं ओळखत असतो. धंद्यामुळेचा ताण, आर्थिक नुकसानीचा ताण या सगळ्यांमुळे नकळत आत्मविश्वासाला तडा जातो. स्वतःच्या क्षमतेवर ,कर्तबगारीवर परिणाम होतो .एक मन स्वतःला कमी लेखतं तर दुसरं मन परत स्वतःला प्रत्येक बाबतीत सिद्ध करायचा आटोकाट प्रयत्न करत असतं.

त्यामुळे चिडचिड होत असते. आंतरिक संघर्ष वाढल्याने , ताणतणावाने मानसिक थकवाही जाणवतो. मन अलवार बनून छोट्या गोष्टींचाही त्रास होतो. त्यामुळे अशा वेळी घरातल्यांची आणि विशेषतः पत्नीची प्रेमळ व समंजस साथ हवी. मुलांशी संवाद साधून परिस्थितीची व्यवस्थित जाणीव दिली तर त्यांना सगळं नीट समजू शकते. थोडं कलाने घेणे, समोरचा चिडल्यावर शांत राहणे, वाद वाढणार नाही याची काळजी घेणे ,यातून म्हणजे कृतीमधून आपले सहकार्य त्या व्यक्तीपर्यंत पोहचवले तर हा मोरल सपोर्ट खूप गोष्टी करू शकतो. तुमचं समाधान त्यांच्यापर्यंत पोहचवायला हवं. काही कमी पडतंय घरात असं नजरेस नको दिसायला. आणि ही गोष्ट प्रत्येक स्त्री नक्कीच करू शकते. त्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी घ्यायचा प्रयत्न हवा. म्हणजे बोलण्यातून नाही तर कृतीतून आपलं मन त्या व्यक्तीपर्यंत पोहचेल. कुठल्याही नोकरी-व्यवसायात आणि आयुष्यातही असे चढ-उतार येणारच. तेव्हा लक्षात असू द्या “रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल !” हेही दिवस जातील ! नक्की जातील !!

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER