गॅस, रेल्वे आणि बँकिंगमध्ये झाले हे बदल

Gas & Raiway & Bank

मुंबई : दैनंदिन जीवनाशी संबंधित गॅस सिलिंडरसह बँकिंग आणि रेल्वे वेळापत्रकात रविवारपासून (१ नोव्हेंबर) बदल होत आहेत. या सर्व नियमांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होऊ शकतो.

घरगुती गॅस
एलपीजी सिलिंडरच्या होम डिलिव्हरी यंत्रणेत मोठे बदल होणार आहेत. घरगुती वापराचा सिलिंडर बुक केल्यानंतर काही दिवसांनी एजन्सीचे कर्मचारी तो घरपोच करतात. सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी (वन टाईम पासवर्ड) बंधनकारक करण्यात आला आहे. सिलिंडर ऑनलाईन बुक करताना ग्राहकांना पैसे भरावे लागतील. त्यानंतर ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलिंडरची डिलिव्हरी करण्यासाठी आल्यानंतर त्याला हा ओटीपी दाखविल्यानंतरच सिलिंडर दिले जाणार आहे. देशातील १०० स्मार्ट शहरांमध्ये सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी गरजेचा करण्यात आला आहे. त्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये हा नियम लागू केला जाणार आहे.

इण्डेन गॅसने बदलला सिलिंडर बुकिंगचा नंबर
देशातील आघाडीची एलपीजी गॅस विक्रेता इण्डेन गॅसने बुकिंगसाठी आपला नंबर बदलला आहे. कंपनीने आता संपूर्ण देशासाठी 7718955555 हा एकच नंबर जारी केला आहे. या नंबरवर कॉल किंवा एसएमएस करून सिलिंडरचे बुकिंग करता येणार आहे.

बँकिंग क्षेत्रातील बदल
स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यांवरील व्याजदर १ नोव्हेंबरपासून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयने व्याजदरात ०.२५ टक्क्याची कपात करून तो ३.२५ टक्क्यांवर आणला आहे. तसेच १ नोव्हेंबरपासून बँक ऑफ बडोदा ग्राहकांकडून एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक पैसे जमा करणे आणि काढणे अशा दोन्ही व्यवहारांवर शुल्क आकारणार आहे. वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत.

रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल करणार आहे. यापूर्वी रेल्वेच्या वेळापत्रकात १ ऑक्टोबरपासून बदल पाहायला मिळत होता. मात्र, यावेळी ३१ ऑक्टोबरपासून वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ १ नोव्हेंबरपासून प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक लक्षात घ्यावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER