या कलाकारांनाही सुरुवातीला नाकारले होते

Irrfan Khan - Govinda

बॉलिवुडमध्ये आल्यानंतर एखादा कलाकार यशस्वी झाला की सगळ्यांना त्याचे यश, पैसा आणि त्याने कमवलेली लोकप्रियता दिसते. पण यशाच्या शिखरावर चढण्यासाठी आणि तेथे पोहोचण्यासाठी त्यांनी काय काय केलेले असते हे त्याच्या फॅन्सना जास्त ठाऊक नसते. या बॉलिवुडमध्ये बाहेरून येऊन यशस्वी होणे सोपे नसते. त्यामुळेच अनेक कलाकारांना सुरुवातीलाच कोणीही काम देत नाही. त्यांचे रंग, रूप, ऊंची, चेहरा यावर प्रचंड टीका केली जाते. पण हे कलाकार हार न मानता सतत मेहनत करीत राहातात आणि कधी ना कधी यश मिळवतात. यश मिळवल्यानंतर मात्र ज्यांना सुरुवातीला त्यांना नाकारलेले असते तेच त्यांना सिनेमात घेण्यासाठी धडपडत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांची गोष्ट सांगणार आहोत ज्यांना सुरुवातीला विविध कारणांनी नाकारले पण नंतर त्याच कलाकारांनी बॉलिवुडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले.

आज अमिताभ बच्चनला (Amitabh Bachchan) महानायक म्हटले जाते. आजही सिनेमांमध्ये अमिताभला महत्वाच्या मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली जाते. पण याच अमिताभला सुरुवातीच्या काऴात अनेकांनी नाकारले होते. याची कारणेही विचित्र होती. अमिताभचा लुक आणि त्याची उंची नायकाला साजेशी नसल्याने अनेकांनी त्याला नाकारले होते. ‘सात हिंदुस्तानी’, ‘रेश्मा और शेरा’सह अनेक सिनेमांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका करीत जवळ-जवळ 8 वर्ष अमिताभने संघर्ष केला. आनंदमध्ये राजेश खन्नाच्या समोर उभे राहून शाबासकीही मिळवली होती. पण नायकत्व दूर होते. संघर्ष काळात मित्र असलेल्या मेहमूदच्या घरीच अमिताभ राहात होता. मेहमूदनेच अमिताभला सर्वप्रथम ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये नायक साकारण्याची संधी दिली. त्यानंतर प्रकाश मेहरा यांचा ‘जंजीर’ आला आणि बॉलिवुडमध्ये अमिताभ युग सुरु झाले.

90 च्या दशकात गोविंदा (Govinda) हा सुपरस्टार होता. त्याने अगदी रजनीकांत, अमिताभ, दिलीप कुमार, राज कुमार अशा स्टार्ससोबत एकत्र काम केले. पण सुरुवातीच्या काळात त्याला कोणीही काम देत नव्हते. तो रोज निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन काम मागत असे. पण त्याचा चेहरा नायकाला साजेसा नसल्याचे सांगत त्याला नाकारले जात असे. एकदा एका निर्मात्याकडे तो काम मागण्यासाठी गेला असता तेथे एक स्टार बसलेला होता. गोविंदा आणि निर्मात्याचे बोलणे सुरु असताना त्या स्टारने म्हटले होते, हीरो बनायची लायकी नसताना काही पोरं नायक बनायला येतात. तो सिनेमा गोविंदाला मिळाला नव्हता. पण यशस्वी झाल्यानंतर गोविंदाने त्या कलाकाराबरोबर काम केले आणि त्याच्या ज्येष्ठत्वाचा आदरही केला. पहलाज निहलानी यांनी ‘इल्जाम’मध्ये गोविंदाला नायक बनवले आणि तेथूनच त्याचे करिअर खऱ्या अर्थाने सुरु झाले. त्यानंतर त्याने अनेक हिट सिनेमे दिले.

आज अजय देवगन (Ajay Devgan) बॉलिवुडटा सुपरस्टार मानला जातो. त्याचे सिनेमे सुपरहिट होत असतात. अजय देवगणचे खरे नाव विशाल पण सिनेमासाठी त्याने अजय नाव घेतले. पित्याने ‘फूल और कांटे’मध्ये लाँच करूनही आणि हा सिनेमा हिट होऊनही अजयला निर्माते त्यांच्या सिनेमात घेत नव्हते. अजयचा चेहरा नायकाला साजेसा नाही असेच निर्माते म्हणत असत. चेहरा तर नाहीच रंगही सावळा असल्याने अनेकदा त्याने साईन केलेल्या सिनेमांमधूनही काढून टाकण्यात आले होते आणि त्याच्या जागी चांगल्या दिसणाऱ्या नायकाला घेण्यात आले होते. पण अजय देवगणने हार मानली नाही. तो सतत निर्मात्यांच्या दारी काम मागण्यासाठी जात होता. अखेर त्याला काम मिळू लागले आणि त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवले. अॅक्शन हीरो म्हणून सुरुवात करणाऱ्या अजयने गंभीर आणि विनोदी भूमिकाही तितक्याच सशक्तपणे केल्या. आज अजय केवळ अभिनेताच नाही तर निर्माता आणि दिग्दर्शकही झाला आहे.

अजय देवगणप्रमाणेच इरफान खानलाही सुरुवातीला कोणीही उभे करीत नव्हते. तो कुठल्याही अंगाने हीरो वाटत नव्हता. मीरा नायरने त्याला सलाम बॉम्बेमध्ये संधी दिली. त्यानंतर तो आर्ट फिल्ममध्ये काम करू लागल्याने मेन स्ट्रीम सिनेमात त्याला संधी दिली जात नव्हती. त्याच्या अभिनयाची चर्चा सुरु झाल्यानंतर मात्र त्याला मेनस्ट्रीममधील निर्मात्यांनी सिनेमात घेणे सुरु केले, अभिनयाच्या बळावरच इरफान खानने थेट हॉलिवुडमध्ये धडक मारली होती. त्याने हॉलिवुडच्या मोठ्या सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या हे त्याच्या अभिनयाचेच यश होते.

सुरुवातीला नाकारलेल्या परंतु नंतर यशस्वी झालेल्या नायकांचा विचार करता पटकन आठवलेली ही नावे आहेत. यात नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) अशा कलाकारांचा समावेश केला तर ते अयोग्य ठरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER