या कलाकारांनी केला बॅकस्टेज डांसर ते मुख्य कलाकार असा प्रवास

These artists made the journey from backstage dancer to lead artist

बॉलिवुडमध्ये (Bollywood)सहजासहजी यश कोणालाही मिळत नाही. यश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. तुम्ही स्टार किड असाल वा बॉलिवुडमध्ये यशस्वी असलेल्या कुटुंबापैकी असा, जर तुमच्यात गुण असतील तरच प्रेक्षक तुम्हाला स्वीकारतात. ग्लॅमरचे जग हे संपूर्णपणे प्रेक्षकांच्या हातात असते. एखाद्यात गुण असतील तर मग तो कोणीही असो त्याला प्रेक्षक डोक्यावर घेतात आणि एखाद्यात गुण नसले की त्याला कुठे फेकून देतात ते कळतही नाही. बॉलिवुडमधील मोठ्या कुटुंबातील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी सुरुवात तर धमाक्याने केली आणि नंतर ते कुठे गेले ते कोणालाच ठाऊक नाही. मात्र असेही काही कलाकार आहेत ज्यांनी अत्यंत खालून म्हणजे एक्स्ट्रा वा बॅकग्राऊंड डांसर म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर ते मुख्य कलाकार म्हणून यशस्वी झाले.

अशा खालून वर आलेल्या कलाकारांमध्ये मुमताजचे नाव पहिल्या क्रमांकावर घ्यावे लागेल. बाल कलाकार म्हणून काम करणाऱ्या मुमताजने नंतर बॅकग्रांऊंड डांसर म्हणून काम केले. त्यानंतर सहनायिकेच्या भूमिका करू लागली. दारा सिंहबरोबर अॅक्शन सिनेमे करणारी मुमताज स्टंट सिनेमाची नायिका म्हणून ओळखली जाऊ लागली होती. परंतु मेहनत आणि अभिनयाच्या बळावर मुमताजने बॉलिवुडच्या राजेश खन्ना, शम्मी कपूर अशा सुपरस्टार्सबरोबर काम करून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते.

 (Kajol Agrawal)काजल अग्रवाल सध्या आघाडीची नायिका म्हणून ओळखली जाते. बॉलिवुडच नव्हे तर साऊथमध्येही काजलने प्रचंड यश मिळवले आहे. मात्र काजलनेही बॉलिवुडमध्ये बॅकग्राउंड डांसर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र बॉलिवुडमध्ये अभिनेत्री म्हणून काम मिळत नसल्याने काजल साऊथला गेली आणि तेथे यशस्वी झाली. त्यानंतर काजल बॉलिवुडमध्ये आली आणि येथेही यश मिळवले.

आज शाहिद कपूर (Shahid Kapoor) आघाडीचा नायक झाला आहे. त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळवत असल्याने त्याला साईन करण्यासाठी निर्माते एका पायावर तयार असतात. मात्र वडिल पंकज कपूर बॉलिवुडमधील नामवंत अभिनेते असले तरी शाहिदने मात्र बॅकग्राऊंड डांसर म्हणून बॉलिवुडमध्ये एंट्री घेतली होती. शाहिदने ऐश्वर्या रायच्या सुभाष घई निर्मित ‘ताल’ सिनेमातील एका गाण्यात बॅकग्राऊंड डांसर म्हणून काम केले होते. त्यानंतर करिश्मा कपूरच्या ‘दिल तो पागल है’ गाण्यातही तो मागे दिसला होता. मात्र लवकरच त्याला सिनेमे मिळू लागले आणि तो यशस्वी नायक झाला.

शाहिदप्रमाणेच अर्शद वारसीही (Arshad Warsi) कोरियोग्राफर आणि बॅकग्राऊंड डांसर म्हणून काम करीत होता. जीतेंद्रच्या ‘आग से खेलेंगे’ सिनेमातील एका गाण्यात अर्शद बॅकग्राउंड डांसर म्हणून दिसला होता. नंतर अर्शद नायक झाला. पण त्याचा सिनेमा चालला नाही. त्यानंतर त्याने सहनायकाच्या भूमिका करण्यास सुरुवात केली आणि त्यात यश मिळवले. यश मिळाल्यानंतर मात्र त्याला नायकाच्या भूमिका मिळू लागल्या होत्या.

दिया मिर्झाने (Diya Morza) काही काळ बॉलिवुडमध्ये गाजवला होता. अनेक हिट सिनेमे तिने दिले होते. पण नायिका बनण्यापूर्वी दियानेही बॅकग्राऊंड डांसर म्हणून बॉलिवुडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. बॉलिवुडच्या काही सिनेमात तिने असे काम केले. साऊथमध्येही ती बॅकग्राऊंड डांसर म्हणून काम करीत असे. अरविंद स्वामी आणि इशा कोप्पीकर अभिनीत एन स्वसा कातरे सिनेमातील एका गाण्यात दिया पाठीमागे होती. मात्र लवकरच तिने नायिका बनण्याकडे पाऊल टाकले आणि रहना है तेेरे दिल में सिनेमातून ती प्रेक्षकांसमोर आली होती. आज दियाकडे जास्त काम नाही.

दियाप्रमाणेच मौनी रॉयही (Mouni Roy) यशाच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी बॅकग्राऊंड डांसर म्हणूनच काम करीत होती. अभिषेक बच्चन आणि भूमिका चावलाच्या ‘रण’ सिनेमातील एका गाण्यात मौनीने बॅकग्राऊंड डांसर म्हणून काम केले होते. ते काम करीत असतानाच तिला मालिकांमध्ये काम मिळू लागले. मालिकांमध्ये तिने यश मिळवले त्यामुळे सिने निर्मात्यांची तिच्याकडे नजर वळली आणि मौनी सिनेमात आली. पहिल्यात सिनेमात मौनीला अक्षयकुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. हा सिनेमा होता ‘गोल्ड’. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी झाला होता.

या यादीत शेवटचे नाव सुशांत सिंहचे (Sushant Singh) घ्यावे लागेल. स्वर्गीय सुशांत सिंहनेही बॉलिवुडमझ्ये बॅकग्राउंड डांसर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. ऋतिक रोशन, ऐश्वर्याच्या ‘धूम 2’ मधील धूम मचाले गाण्यात ऋतिक रोशनच्या मागे सुशांत सिंह नाचताना दिसला होता. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळांच्या समापन सोहोळ्यात ऐश्वर्या रायच्या मागे डांस केला होता. त्यानंतर त्याने मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेथे यश मिळवल्यानंतर त्याने सिनेमाकडे मोर्चा वळवला होता आणि तेथेही चांगले यश मिळवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER