हे आहेत बॉलिवूडमधील टॉप सस्पेंस थ्रिलर चित्रपट

top suspense thriller movies in Bollywood

सस्पेंस थ्रिलर चित्रपट बनवणे सोपे नसते. प्रेक्षकांना पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत बांधून ठेवणे फार कठिण असते. एवढेच नव्हे तर प्रेक्षकांचे अंदाज चुकवणेही आवश्यक असते. आणि यात जे दिग्दर्शक यशस्वी होतात त्यांचेच सस्पेंस चित्रपट प्रेक्षकांना आवडतात आणि ते चित्रपट यशस्वी होतात. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये अनेक सस्पेंस चित्रपट तयार होत असले तरी फार कमी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सस्पेंस चित्रपटाची माहिती देत आहोत.

सस्पेंस चित्रपटाची सुरुवात 1949 च्या ‘महल’ चित्रपटाने झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशोक कुमार आणि मधुबाला अभिनीत हा सस्पेंस चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. या चित्रपटातील ‘आएगा आएगा आएगा आने वाला’ गाणे आजही लोकप्रिय आहे.

यानंतर नाव घेता येईल ‘गुमनाम’ चित्रपटाचे. 1965 मध्ये आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना शेवटच्या फ्रेमपर्यंत बांधून ठेवले होते. अगाथा ख्रिस्तीच्या कथेवर आधारित आणि राजा नवाथे दिग्दर्शित मनोजकुमार अभिनीत या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. नंदा, प्राण, मेहमूद, मदन पुरी असे एकाहून एक सरस कलाकारांनीही त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्कृष्टपणे साकारल्या होत्या. गुमनाम है कोई, हम काले हैं तो क्या हुआ ही गाणी आजही एकली जातात. एका निर्जन बेटावर काही मंडळी येतात. आणि अचानक एकेकाची हत्या होऊ लागते. या हत्या कोण करते हे शेवटपर्यंत प्रेक्षकांना कळत नाही. आणि शेवटी जेव्हा सस्पेंस उलगडते तेव्हा प्रेक्षक चकित होऊनच चित्रपटगृहाबाहेर पडतात. 1960 च्या दशकातील हा एक सर्वोत्कृष्ट सस्पेंस चित्रपट होता.

यानंतर 1990 च्या दशकात आलेल्या ‘100 डेज’ चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित अभिनीत या चित्रपटात माधुरीने अभिनयाची कमाल दाखवली होती. माधुरीला तिच्या मृत्युमुखी पडलेल्या बहिणीबाबत स्वप्न पडत असतात. बहिणीची कोणी तरी हत्या केली हे तिला सतत वाटत असते. ती स्वप्नाबाबत सांगूही इच्छित असते पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. तिच्या बहिणीची हत्या कोणी केली हे शेवटी उघड होते. पार्थो घोष यांनी अत्यंत उत्कृष्टपणे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘गब्बर सिंह ये कह कर गया जो डर गया वह मर गया’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

त्यानंतर 1992 मध्ये अब्बास मस्तान या जोडीने दिग्दर्शित केलेल्या ‘खिलाड़ी’ चित्रपटाचे नाव घेता येईल. या चित्रपटातही एक हत्या होते आणि त्या हत्येचा आरोप नायकावर असतो. मात्र खरा खूनी कोणी वेगळाच असतो. अक्षय कुमार, आयशा झुल्का, दीपक तिजोरी, जॉनी लिव्हर यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘वादा रहा सनम’, ‘खुद को क्या समझती हो’ अशी चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती.

त्यानंतर अधे मधे अनेक सस्पेंस थ्रिलर आले परंतु ते म्हणावे तसे यशस्वी ठरले नाहीत. मात्र 1997 मध्ये बॉबी देओल, काजोल आणि मनिषा कोईराला अभिनीत ‘गुप्त’ चित्रपट आला होता. राजीव राय दिग्दर्शित या चित्रपटात एकामागोमाग एक हत्या होत असतात. या हत्या कोण आणि का करतेय याचा विचार प्रेक्षक करीत असतात. आणि शेवटी जेव्हा रहस्य उलगडते तेव्हा प्रेक्षक थक्क होतात. या चित्रपटातील ‘दुनिया हसीनों का मेला’, ‘मेरे ख्वाबो में तू’ या गाण्यांसह शीर्षक गीत ‘गुप्त गुप्त’ प्रचंड लोकप्रिय झाले होते.

यानंतर 1999 मध्ये उर्मिला मातोंडकरची प्रमुख भूमिका असलेला ‘कौन’ चित्रपट आला. याचे दिग्दर्शन रामगोपाल वर्माने केले होते. मनोज वाजपेयी आणि उर्मिलाच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट शेवटपर्य़ंत खिळवून ठेवणारा होता.

आतापर्यंत खूनी कोण या सस्पेंसभोवती फिरणारे चित्रपट आले पण 2012 मध्ये ‘कहानी’ चित्रपटात वेगळाच सस्पेंस मांडण्यात आला होता. विद्या बालन अभिनीत या चित्रपटात एक गर्भवती स्त्री आपल्या पतिला शोधण्यासाठी कोलकात्यात येेते आणि शेवटी जे रहस्य उलगडते त्याने प्रेक्षक चकित होतो.

2015 मध्ये नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या निशिकांत कामतने ‘दृश्यम’ चित्रपट आणला होता. अजय देवगन अभिनीत या चित्रपटात नायकच हत्या करतो आणि त्यातून तो कसा सुटतो हे अत्यंत मनोरंजकपणे दाखवले होते. आणि रहस्यही शेवटच्या फ्रेमपर्यंत टिकवून ठेवले होते. मोहनलाल यांच्या याच नावाने गाजलेल्या चित्रपटाची ही हिंदी रिमेक होती.

याशिवायही अनेक चित्रपट आहेत पण सगळ्यांचाच उल्लेख येथे करणे शक्य नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER