या आहेत ‘गुप्ते वहिनी’

Avshut Gupte -Swapnil Bandodkar

मित्रमंडळींच्या टोळक्यात मित्रांना खऱ्याखुऱ्या नावाने हाक मारायची नसते हा जणू काही अलिखित नियम असावा. कारण कधीही बघा, मित्रांना त्यांच्या नावाने व्यवस्थित हाक मारण्यात जी मजा नाही ती त्या मित्रांना काही तरी भलतेच नाव देऊन बोलवण्यात खूप धमाल आहे. अनेकदा मित्रांना त्यांच्या वडिलांच्या नावाने हाक मारली जाते. तर मित्रमंडळी जेव्हा एकत्रित ट्रिपला जातात किंवा कट्टा टाकतात तेव्हा प्रत्येक मित्रासाठी ग्रुपमध्ये एक वेगळेच नाव दिलेले असते. सेलिब्रिटी कलाकारांची मैत्री जमते तेव्हादेखील मैत्रीची ही व्याख्या त्यांच्यामध्ये लागू होते. सेलिब्रिटी गायक अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) याला त्याच्या खास मित्रांनी एक असे नाव दिले आहे जे ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल की अवधूत गुप्तेला त्याच्या मित्रमंडळीचा ग्रुप ‘गुप्ते वहिनी’ नावाने का बोलवतो ? हे काय प्रकरण आहे हे उघड केले ते अवधूतचा मित्र गायक स्वप्नील बांदोडकर (Swapnil Bandodkar) याने.

अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर यांची जवळपास पंधरा ते वीस वर्षांपासूनची मैत्री आहे. गाण्याच्या करिअरमधल्या संघर्षकाळात या दोघांनी एकमेकांना खूप मोलाची साथ दिली. इतकेच नव्हे तर अवधूत आणि स्वप्नील हे दोघेही त्यांच्या करिअरच्या अनेक घडामोडींचे साक्षीदार आहेत. आजच्या घडीला अवधूत आणि स्वप्नील आघाडीचे गायक असले तरी त्यांच्या मैत्रीच्या सुरुवातीच्या काळातील अनेक आठवणी या दोघांच्या गप्पांच्या मैफलीत नेहमीच रंगतात. अशीच एक खास बात अवधूत गुप्तेची आहे, ज्यामुळे अवधूतला त्याच्या सगळ्या मित्रांचा ग्रुप ‘गुप्ते वहिनी’ म्हणून हाक मारतो. पण या गुप्ते वहिनीमुळेच या सगळ्या मित्रांना भरपेट खाण्याची संधी मिळते हे पण तितकेच खरे आहे. आता अवधूतला त्याचे मित्र फार फार तर काय म्हणू शकले असते? अवध्या, गुप्त्या; पण नाही, ज्या वेळेला मित्रांचा हा ग्रुप सहलीसाठी कुठेही बाहेर गेलेला असतो तेव्हा ही सगळी मंडळी अवधूतला ‘गुप्ते वहिनी’ अशी हाक मारतात त्याचं कारणही खूप भन्नाट आहे.

मित्रमंडळी एकत्र येऊन ट्रिप प्लान करतात तेव्हा त्या पर्यटनस्थळी रस्त्यावरून फिरताना अवधूत नेहमी हॉटेलमधून बाहेर पडत असताना दोन-तीन पिशव्या घेऊन बाहेर पडतो. कशासाठी माहित्येय ? तर अवधूत हॉटेलवर परत येताना वेगवेगळ्या भाज्या, ब्रेड, सॉस, बटर अशा वस्तू घेऊन येतो. त्याचे मित्र भटकंती करत असतात आणि अवधूत मात्र रस्त्यावर कुठे किराणा मालाचे दुकान दिसते का ? खाण्याच्या वस्तू असतील अशी दुकानं दिसतात का ? याचा शोध घेऊन खरेदी करत असतो. अनेक शहरांमध्ये पर्यटनासाठी गेल्यानंतर अवधूतच्या हातात किमान दोन-तीन किलो वजनाचे सामान भरलेली पिशवी असते आणि ती पिशवी घेऊन तो भटकंती करत असतो.

त्या वेळेला सगळे मित्र अवधूतची चेष्टा करत असतात; पण जेव्हा हे सगळे त्यांनी बुक केलेल्या रिसॉर्टवर किंवा एखाद्या बंगल्यावर येतात तेव्हा अनेकदा उशीर झालेला असतो. कधी कधी डिनर टाईम संपलेला असतो आणि मग अवधूत बाहेरून आणलेल्या साहित्यापासून काही तरी असं भन्नाट खायला बनवतो की, सगळ्यांची भूक भागली जाते आणि म्हणूनच अवधूतला त्याचे मित्र ‘गुप्ते वहिनी’ अशी हाक मारतात. आमच्या गुप्ते वहिनी आम्हाला खाऊपिऊ घालतात आणि आमच्या पोटाची आबाळ होऊ देत नाहीत असे त्याच्या मित्रमंडळींचे म्हणणे आहे. अवधूतसुद्धा हे ‘गुप्ते वहिनी’ नाव नेहमी एन्जॉय करतो. अवधूतला खूप चांगले पदार्थ बनवता येतात. कोणी घरी आले की त्याला स्वतःच्या हाताने काही तरी खाऊपिऊ घालण्याची अवधूतला हौस आहे. त्यामुळे अवधूत त्याच्या मित्रांसोबत कुठेही ट्रिप एन्जॉय करत असतो तेव्हा मित्रांना खायला मिळालं नाही किंवा हॉटेलवर जेवण संपलं तर काय करायचं, हा प्रश्न कधीच सतावत नाही; कारण त्यांना खायला घालण्यासाठी त्यांची गुप्ते वहिनी त्यांच्यासोबत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER