राज्यात आणखी दोन-तीन दिवस ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा भासणार!

Rajendra Shingne - Remdesivir

मुंबई :- राज्यात एकीकडे कोरोनाचा (Corona) संसर्ग सातत्याने वाढत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा कोलमडत चालली आहे. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढवण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीनंतर अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) म्हणाले की, “आपल्याला लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन हे कंपन्यांकडून जवळपास १२ ते १५ हजार इतके कमी मिळाले आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा अजून दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार आहे.

नुकतीच माझी काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशा प्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील? किती वाढवला जाणार आहे? साधारण तीन आठवड्यांपूर्वी याच कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत मी बैठक घेतली. त्या वेळेस मला त्यांनी पुढील १५ तारखेपर्यंतचा अंदाज दिला होता. त्यानुसार रोज महाराष्ट्रात ५५ हजार रेमडेसिवीर पुरवतील, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. परंतु, कालच्या तारखेपर्यंत सरासरी जर आपण पाहिली, तर ३७ ते ३९ हजारांपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवले आहे.” असे डॉ.शिंगणे यांनी सांगितले.

२० एप्रिलनंतर पुरवठा सुरळीत

“ही सर्व आकडेवारी बघता रोज रुग्णांची संख्या वाढत आहे आणि रुग्णांना रेमडेसिवीर देण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. १९-२० एप्रिलनंतर हा पुरवठा सुरळीत होईल, अशा प्रकारचे त्यांनी मला आश्वासन दिले.” असे डॉ. शिंगणे म्हणाले.

त्याचबरोबर, “केंद्र शासनाने तीन-चार  दिवसांपूर्वी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. रेमडेसिवीरची निर्यातबंदी त्यांनी केली, हे अतिशय चांगले केले. यामुळे निर्यातीसाठी तयार असलेला रेमडेसिवीरचा मोठा साठा देशभरातील व काही महाराष्ट्रातील कंपन्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात कंपन्यांना त्यांचा माल येथे विकण्यासाठी परवानगी देण्याबाबत आम्ही कालच बैठक घेतली आहे. शिवाय विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांशीदेखील बोलणे झाले. आता त्या कंपन्यांशी संपर्क साधण्याचे काम आमच्या विभागाकडून सुरू आहे.” अशी माहिती शिंगणे यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : रेमडेसिविर इंजेक्शन्स तातडीने मिळाले नाही तर …   भाजप नेत्याचा इशारा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button