दिल्लीत पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

नवी दिल्ली : दिल्लीत झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने ही दंगल घडवून आणली. त्यामुळे आता दिल्लीत पुन्हा दंगल झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते शनिवारी पंढरपूर येथे नाभिक समाजाच्या मेळाव्यात बोलत होते.

दिल्लीच्या दंगलीत अनेकजण सैनिकी गणवेश परिधान करून घुसल्याचे सांगितले जाते. एका अहवालानुसार कोणीतरी २५ लाख सैनिकी गणवेश विकत घेतल्याची माहिती आहे. सरकारने या सगळ्याचा माग काढण्याची गरज आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

राजसत्ता धर्मसत्तेच्या ताब्यात गेली की कारभार व्यवस्थित चालू शकत नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात जे घडले तेच आता मोदींच्या काळात घडत असल्याचेही आंबेडकर म्हणाले. दरम्यान आंबेडकर यांनी भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्ववर स्वामी यांच्या बनावट जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यासंदर्भातही भाष्य केले.