खरीप हंगामासाठी खते, बियाण्यांची कमतरता भासणार नाही – दादाजी भुसे

Dadaji Bhuse

जळगाव : राज्य शासनाने राज्याच्या कृषी विभागाकडे त्यांच्या मागणीपेक्षाही जास्त खते तसेच बियाणे पुरवठा केला असल्याने शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी खते तसेच प्रमाणित बियाण्यांची कमतरता भासणार नाही एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खते तसेच बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. कोणत्याही खते आणि बियाणे विक्रेते दुकानदारांनी खतांचा किंवा बियाण्यांचा तुटवडा आहे असे भासवून त्यात काळा बाजार करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत केल्या.

याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा उपनिबंधक (सहकार) मेघराज राठोड यांचेसह महसूल, पुरवठा, सहकार, कृषी, मार्केटिंग तसेच बॅकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, बॅंकांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत सामाजिक भावनेतून विचार करून कर्ज देताना पारदर्शकतेसोबतच लवचिक धोरण अवलंबिणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या 22 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचे आधार संलग्न झालेले नसतील तरी देखील अशा शेतकऱ्यांना किमान 50 टक्के कर्जमुक्ती द्यावी व उर्वरित 50 टक्के कर्जमुक्ती आधार संलग्नीकरण झाल्यावर द्यावी अशा सूचनाही बैठकीस उपस्थित बँकांच्या प्रतिनिधींना दिल्यात. महात्मा फुले कर्जमुक्ती पासून एकही शेतकरी वंचीत राहता कामा नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. पणन महासंघाने आणि बाजार समित्यांनी कापूस, ज्वारी, मका खरेदी लवकरात लवकर करावी जेणे करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडील 100 टक्के मालाची खरेदी केली जाईल आणि हे करीत असताना कापूस, ज्वारी, मका हा शेतकऱ्यांकडीलच खरेदी होईल याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा मार्केटिेंग, बाजार समित्या आणि पणन महासंघाच्या प्रतिनिधींना दिल्या.

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीस उपस्थित राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे जिल्ह्याच्या विकासातील मुख्य घटक आणि जिल्ह्याचे मुख्य पिक केळी पिकासाठी केळी महामंडळाची निर्मिती व्हावी, लिंबू प्रक्रिया केंद्र आणि संशोधन केंद्राची मागणी केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन उठवल्यानंतर पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खते आणि बियाणे तसेच शेतकरी ते थेट ग्राहक या तत्वानुसार हापूस आंबा, तांदळाचे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोच या मोहिमेचा प्रातिनिधीक स्वरुपात शुभारंभ पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी अजिंठा विश्रामगृह येथे या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून केला.


Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER