पोलीस भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही; गृहमंत्री देशमुखांची ग्वाही

Anil Deshmukh

पुणे :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मोठे वादंग उठले. त्यातच राज्य शासनाने मेगा पोलीस भरतीची (Police Recruitment) घोषणा केली. त्यानंतर मराठा समाजाकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. आरक्षण मिळेपर्यंत पोलीस भरती न करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे. दरम्यान पोलीस भरतीत मराठा समाजावर (Maratha Community) अन्याय होणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली.

आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) घोषित केलेल्या साडेबारा हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही. मराठा समाजातील १३ टक्के तरुणांना यात संधी मिळणार आहे, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देखमुख यांनी दिले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी देशमुख म्हणाले की, साडेबारा हजार भरती करता जवळपास २५ लाख अर्ज येण्याची शक्यता आहे. ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी किमान पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मराठा समाजातील १३ टक्के तरुणांना यामध्ये संधी मिळणार आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, ही सरकारची भूमिका राहणार आहे, असेही देशमुख म्हणाले.

दरम्यान, खासदार संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje) यांनी भरतीचा निर्णयच मागे घेण्याची मागणी सरकारला केली आहे. मराठा समाजाच्या १३ टक्के जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे, असंही संभाजीराजे यांनी नुकतंच म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER