‘बंगालच्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या नव्या आघाड्या होतील’, राऊतांचे मोठे विधान

Sanjay Raut

मुंबई : सध्या देशातील चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या निकालानंतर देशातील राजकारणाच्या भविष्याची दिशा ठरवणार असल्याचं मत शिवेसना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने आपली संपूर्ण ताकद झोकून दिली असली तरी ममता बॅनर्जी (Mamata Banerajee) एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे असा विश्वासही संजय राऊत(Sanjay raut) यांनी व्यक्त केला. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात ३०, तर आसाममध्ये ३९ जागांसाठी मतदान होत आहे.

यावेळी राऊत म्हणाले की, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा दाखवणार आहेत. खासकरुन पश्चिम बंगाल आणि आसाम, केरळ आणि तामिळनाडूत काय होईल याचा अंदाज आपण मांडू शकतो. पण आसाममध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाजपाचं राज्य असलं तरी काँग्रेस चांगली टक्कर देत आहे. पश्चिम बंगालच्या निकालांनंतरच देशाचं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे आणि विरोधी पक्षांच्या आघाड्या स्थापन होऊन ते कोणती भूमिका घेतील हे स्पष्ट होईल. ममता बॅनर्जी सहज विजयी होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

ममता बॅनर्जी यांनी देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना ते म्हणाले की, या देशात लोकशाहीवर नेहमीच हल्ले झालेले आहेत, ही पहिली वेळ नाही. याविरोधात जनता, विरोधी पक्ष लढले आहेत, म्हणूनच आपल्या देशात लोकशाही जिवंत आहे. ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं असून आम्ही त्यावर विचार करु. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी हे या देशातील मोठे नेते आहेत, सर्वांनाच पत्र आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी मोहीम सुरु केली आहे आणि याबाबत सर्वांना विचार करावा लागेल, असेही राऊत म्हणाले.

आपल्या राज्यात कोरोनाचे संकट अधिकच वाढले आहे. त्यामुळे लॉकडाउन किंवा करोनाचं राजकारण करु नये. मुख्यमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री जनतेच्या भल्यासाठी सांगत आहेत. सगळ्या विरोधी पक्षाच्या घटकपक्षांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातात हात घालून महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं.

लॉकडाउन हा उपाय नाही या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की, हे आम्हालाही माहिती आहे, यात नवीन काय आहे. मोदींनापण हे माहिती आहे, तरी एक वर्ष लॉकडाउन केला होता. ही गरज आहे. मोदींनी काय प्रेमाने, आनंदाने लॉकडाउन केला नव्हता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील कठोर निर्बंध लावू इच्छित आहे, ती काही त्यांच्यासाठी आनंदाची बाब नाही. पण काय करणार?, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही पाठराखण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button