दंडेलीने थकबाकी वसूल करणार असाल तर उद्रेक होईल; प्रवीण दरेकरांचा इशारा

Maharashtra Today

मुंबई : “कोरोनाकाळात हजारो, लाखोंची वीज बिले पाठवून झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याऐवजी सरकार सक्तीने, दंडेलशाहीने ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणार असेल तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.” असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांना दिला. याबाबत दरेकरांनी ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. महावितरणने तक्रारींचा निपटारा करताना किती ग्राहकांना, किती रकमेची वाढीव बिले कमी करून दिली.

याचा हिशेब जनतेला द्यावा, तोपर्यंत सक्तीची वसुली करता येणार नाही, असे दरेकर यांनी म्हटले आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा दिलेला एकतर्फी आदेश मागे घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. कोरोनाच्या काळातील वीज बिलांची थकबाकी प्रचंड वाढल्याने आता वसुलीची मोहीम सुरू करत पैसे न भरणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय पक्षांकडून विरोध सुरू झाला आहे. भाजपा, मनसे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे समर्थक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीदेखील ‘हिंमत असेल तर वीजजोडणी तोडून दाखवा’ असे आव्हान महावितरणला दिले आहे.

ठाकरे सरकारचं तुघलकी फर्मान
दरेकर यांनी पत्रात म्हटले आहे की, वीज बिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे एकतर्फी आदेश महावितरणने राज्यातील सर्व परिमंडळ कार्यालयांना १९ जानेवारी २०२१ रोजी दिले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री म्हणून डिसेंबरअखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे निर्देश आपण महावितरणाला दिले होते. महावितरण कंपनीने थकाबाकी वसुलीचा निर्णय घेण्यापूर्वी ही थकबाकी ज्या कारणामुळे निर्माण झाली, त्याचा विचार व त्याचे निराकरण केले नाही, असा माझा स्पष्ट आरोप आहे.

हा तर वीज बिलांचा मोठा घोटाळा
लॉकडाऊनच्या काळात सरासरी मीटर वाचनानुसार ग्राहकांना देयके देण्यात आली. ज्या ग्राहकांना दरमहिन्याला एक हजार रुपये बिल येत होते, त्यांना ५ ते १० हजार रुपयांची बिले पाठवण्यात आली. हा प्रकार म्हणजे कोरोना काळात सर्वसामान्यांची लूट करून कंपनीची भर करण्यासारखा होता. कोरोनाकाळात सरासरी मीटर वाचनानुसार पाठविलेल्या मोठ्या रकमांच्या बिलांआडून आता सक्तीने, दंडेलशाहीने वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी देऊन करण्यात येणाऱ्या वसुलीतून कंपनी पुरस्कृत एक मोठा वीज बिलांचा घोटाळा राज्यात घडतो आहे. असा आरोप दरेकर यांनी केला. वीज बिल वसुलीचे महाविकास आघाडी सरकारचे फर्मान तुघलकी व असंवेदनशील असल्याची टीका भाजपाचे माध्यम विभागप्रमुख विश्वास पाठक यांनी केली. तर, सरकार एकीकडे वीज बिलात सवलत देऊ, १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करू, असे म्हणते. मग आता काय झाले? लोकांनी तुमच्यावर का विश्वास ठेवायचा? सरकार फसवणूक करत असून लोकांना अंधारात ढकलले जात असल्याचा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER