आले ३ पायांचे सरकार

badgeदोन काँग्रेसच्या पाठींब्याने शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीच्या सरकारने महाराष्ट्राची सत्तासूत्रे हाती घेतली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १६ वर्षांपूर्वी आपल्या मुलाला म्हणजे उद्धव यांना आपला वारस जाहीर केले होते. बाळासाहेब सत्तेपासून नेहमीच दूर राहिले. १९९५ मध्ये युतीच्या सरकारात शिवसेनेचा मुख्यमंत्री पहिल्यांदा आला. पण बाळासाहेबांनी रिमोट कंट्रोलने काम पाहिले. पण उद्धव यांनी शिवसेनेला नवा चेहरा दिला. त्यांनी यावेळी केवळ आदित्यला निवडणुक लढायला लावली नाही तर आता स्वतःही ते मुख्यमंत्री बनून वाघावर स्वारी करायला निघाले आहेत. आपल्या शपथविधीला राज्यभरातल्या शेतकऱ्यांना आणून आपले सरकार हे ‘शेतकरी सरकार’ असल्याचे मोठा मेसेज उद्धव यांनी दिला आहे. ५९ वर्षे वयाचे उद्धव यांना जमेल हा नवा रोल? भिन्न विचारधारेचे हे सरकार टिकेल? टिकले तर किती टिकेल?

भाजपने ह्या सरकारला तीन चाकांचे सरकार म्हटले आहे. परस्पर विरोधाभासामुळे हे सरकार आपोआप कोसळेल असे विरोधकांचे म्हणणे आहे. सत्ताधाऱ्यांनाही त्याची कल्पना आहे. म्हणूनच काही गोष्टी त्यांनी आधीच लेखी स्पष्ट करून घेतल्या आहेत. उद्धव यांच्याकडून कट्टर हिंदुत्वाला सोडचिठ्ठी लिहून घेतली आहे. उद्धव आता सेक्युलर झाले आहेत. समान किमान कार्यक्रमावर सरकार चालणार आहे. शेतकरी कर्जमाफी हा सरकारचा पहिला अजेंडा आहे. अर्थात त्यासाठी लागणारा प्रचंड पैसा कुठून आणणार? हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. आधीच साडे चार लाख कोटी रुपयाच्या ओझ्याखाली दबलेले सरकार हे नवे ओझं सहन करू शकेल? ते करता आले नाही तर शेतकऱ्यांची नाराजी पदरी येईल. भाजपला याचा फायदा मिळणार आहे.

उद्धव यांना आज गुदगुल्या होत असतील. पण पुढच्या निवडणुकीला ते सामोरे जातील तेव्हा कट्टर हिंदुत्ववादी म्हणून एकमेव भाजपचे आव्हान समोर उभे असेल. हिंदुत्वाची सारी व्होट बँक हातून निसटते आहे हे लक्षात येईल तेव्हा उद्धव यांना वाघनखे काढावीच लागतील आणि त्या क्षणी सरकार कोसळलेले असेल. चारसहा महिन्यांनी अयोध्येतले रामाचे मंदिर बांधकामाला सुरुवात होत आहे. त्यावेळी शिवसेना कशी वागते ते पहावे लागेल.

पण आज तरी उद्धव यांनी बाजी मारली आहे. राज्याचे राजकारण नव्या वळणाने निघाले आहे. दोन्ही काँग्रेस शिवसेनेला घेऊन सरकार बनवतील असे कुणी स्वप्नातही कल्पिले नव्हते. पण ते घडते आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर भाजप एकटा पडू शकतो. २०१४ पूर्वी दोन काँग्रेसच्या आघाडीचे १५ वर्षे सरकार होते. दोघे असताना त्यांच्यात कुरघोड्या चालायच्या. आता तर तिसरा भिडू आला आहे. राष्ट्रवादी आज कितीही आव आणत असली तरी सत्तेची तिची भूक कुरघोड्या थांबवू शकणार नाही. अजितदादा पवार यांना समाधानी ठेवले नाही तर सरकार चालणे अवघड आहे असे आजच पदोपदी दिसते आहे. शरद पवारांच्या मनातले कळत नव्हते. अजितदादाही आपल्या काकाची कार्बन कॉपी आहे.