सत्य बाहेर आल्याशिवाय राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही; पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

Sharad Pawar - Dhananjay Munde

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) झालेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने दखल घेतली. परंतु काल प्रसारमाध्यमांमध्ये तक्रार करणाऱ्या महिलेने आणखी काही लोकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या झळकल्या. त्यामुळे तक्रार करणाऱ्या महिलेचीही चौकशी करण्याची गरज आहे. कोणावरही गुन्हा दाखल करण्यापूर्वी संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी महिला अधिकाऱ्याने करावी अशी मागणी खुद्द राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. तसेच विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र संपूर्ण वस्तुस्थिती बाहेर आल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेऊ.

सध्या त्यांचा राजीनामा घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता खुद्द शरद पवार हे धनंजय मुंडेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेणू शर्मा (Renu Sharma) नामक महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, हातून सत्ता गेल्याने काही जण अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते आमच्याविरोधात बोलणारच.

महिलेने तक्रार केल्यानंतर मीडियातून आणखी नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रकरणावर पोलीस विभाग चौकशी करत आहेत. या बाबतीत आम्ही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी असं मला वाटतं. या महिलेने मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी आणि हे या बाबतीत सत्य समोर आणावं. महिलेच्या बाबतीत भाजपच्या एका नेत्याने स्टेटमेंट दिलं आहे. यामध्ये काळजीपूर्वक चौकशी करावी, असं त्यांनी सांगितलं. काही भाजप (BJP) नेते आरोप करत आहेत. त्यांना टीका करायची असेल त्याबाबत माझं काही म्हणणं नाही. मात्र, वस्तुस्थिती समोर यावी असं आमचं म्हणणं आहे. काल मी या प्रकरणावर बोललो तेव्हा संपूर्ण चित्र माझ्यासमोर नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली.

त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला. आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं. मुंडे यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही, यावर मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्या महिलेच्या बाबतीत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाही तर कुणावरही आरोप करायचे आणि त्या व्यक्तीला सत्तेपासून दूर करायचं अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे या घटनेतील सत्य समोर यायला व्हावं. गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी या प्रकरणात खोलात जाऊन तपास करावा.

जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. या आरोपामधील सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. आरोप झाल्यावर संयम ठेवावा लागतो. सत्यता बाहेर येईपर्यंत थांबावं लागतं. शपथपत्रात मुंडेंनी माहिती लपवली की नाही हे पाहावं लागेल. देशात अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. देशातील सर्वोच्च प्रमुखांबाबतीतही अशा गोष्टी झाल्या आहेत. त्याच्या खोलात जायची गरज नाही. मात्र सत्ता हातातून गेल्याने काही जण अस्वस्थ आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER