महाविकास आघाडी एकसंघ, सरकार अस्थिर होण्याचा प्रश्नच नाही – शरद पवार

sharad pawar

ठाकरे सरकार उत्तम काम करत आहे. आघाडीतील नेत्यांचा चांगला समन्वय असल्याने आघाडी एकसंघ आहे, त्यामुळे सरकार अस्थिर होण्याचा प्रश्नच नाही. असे म्हणत पवारांनी राजकीय चर्चेवर पडदा टाकला.


मुंबई : राज्यात कोरोनाच संकट बिकट होत असताना राजकीय भूकंपहोणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. त्याला कारण म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजभवनावर झालेल्या भेटीगाठी. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट आणि चर्चायावरून ही चर्चा अधिकच रंगली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या हालचाली नाही ना असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मात्र या सगळ्या चर्चांवर खुद्द शरद पवार यांनी पडदा टाकला आहे.

राज्यामध्ये उद्धव ठाकरे सरकार स्थिर आहे. त्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष त्याच्या पाठिशी मजबूत उभे आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष एकत्र आहेत. या कोरोनाच्या महामारीतून महाराष्ट्राला कसं वाचवायचं, यासाठी सगळी ताकद झोकून द्यायची आहे. हे सध्या महाविकास आघाडी सरकारच उद्दिष्ट आहे. तिन्ही पक्षाची हीच भूमिका आहे, असं शरद पवारयांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांच्या भेटीसंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल झाल्यापासून त्यांची एकदाही भेट झाली नव्हती. त्यांनी चहासाठी दोन वेळा निमंत्रण दिले होते. म्हणून काल त्यांना भेटायला गेलो होतो. मुख्यमंत्री महाराष्ट्रात चांगलं काम करत आहेत. तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात असं राज्यपाल काल म्हणाले, असंही पवार यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी नेहमी आढावा घेतो. नेहमी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकवर भेट होत असते. काल मीच मातोश्रीला येतो असं उद्धव ठाकरे यांना कळवलं होतं. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर एकदाच मातोश्रीला भेट दिली होती. यावेळी कोरोना बाबत आढावा घेतला. कोरोना काळात कशी काळजी घेतली पाहिजे याची चर्चा झाली. कुठे किती रुग्ण आहेत, पावसाळ्यात काय काळजी घ्यायची? रुग्ण संख्या वाढते आहे यावर चर्चा झाली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींसह इतर गप्पा झाल्या. सध्या राजकारणाचा विषय नाही. कोरोनाच्या या संकटसमयी कोण राजकीय बोलणार? असंही शरद पवार म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER