पंतप्रधान मोदींवर नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही; संभाजीराजेंचे स्पष्टीकरण

Maharashtra Today

सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अनेक वेळा भेटीची वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी राज्यसभा सदस्य संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे संभाजी छत्रपती मोदींवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, आपण मोदींवर नाराज नाही, असं सांगत संभाजी छत्रपती यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. संभाजी छत्रपती आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही. नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या भावना त्यांना सांगणं काही चुकीचं नाही. वैयक्तिक म्हणून त्यांना भेटण्याचा उद्देश नव्हता. केवळ समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यांना भेटायचं होतं. समाजाचे प्रश्न त्यांच्यासमोर ठेवायचे होते, असं सांगतानाच मोदींनी मला राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून नेहमीच सन्मान दिला. सर्व खासदारांनी मिळून त्यांना भेटावं अशी इच्छा आहे, असंही ते म्हणाले. येत्या ७ जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही, तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. ६ जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे. त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा निर्धार संभाजीराजेंनी व्यक्त केला होता. त्यावर त्यांना विचारण्यात आलं असता, मी सरकारला कोणताही अल्टिमेटम दिला नाही.

शिवराज्याभिषेक सोहळा असतो. त्यामुळे त्या दिनाचं औचित्य साधून सरकारने मराठा समाजाच्या या पाच मागण्यांवर निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे, असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेत आहेत. माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांनी तसं जाहीरही केलं आहे. अजून आठ-नऊ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button