१४ वर्षांच्या मुलीस प्रेमपाशात ओढून फसविणार्‍यास दया नाही

हाय कोर्टाने केली ‘पॉक्सो’ आरोपीची शिक्षा कायम

Mumbai High Court

मुंबई : स्वत:च्या पत्नीच्या बाळंतपणाच्या काळात १४ वर्षांच्या एका मुलीला प्रेमपाशात ओढून तिच्यावर बलात्कार करणार्‍या पनवेल तालुक्यातील एका नराधमास दया दाखविण्यास नकार देत त्याची १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम केली.

पनवेल तालुक्यात भिगारगाव येथे राहणार्‍या आदित्य ऊर्फ सदानंद दिलीप परब या ३० वर्षांच्या तरुणास ‘पॉक्सो’ कायद्याखालील विशेष न्यायालयाने चार वर्षांपूर्वी ही शिक्षा ठोठावली होती. त्याने उच्च न्यायालयात केलेले अपील न्या. अजय गडकरी यांनी फेटाळून लावले. आदित्यची १० पैकी ७ वर्षांची शिक्षा भोगून झाली आहे.

आदित्य हा विवाहित असून त्याला सहा वर्षांची मुलगी आहे. तो पत्नी, मुलगी, आई व बहिणीसाह पनवेलमध्ये राहतो. सांताक्रूझ येथे राहणाऱ्या एका मोलकरणीच्या मुलीशी फोनवरून बोलण्यातून त्याची ओळख झाली. ही मुलगी नवव्या इयत्तेत शिकत होती. आदित्यने गोड गोड बोलून तिला आपल्या प्रेमपाशात ओढले. पण आपण विवाहित आहोत व आपल्याला एक मुलगी आहे हे त्याने तिला सांगितले नाही.

दि. ५ डिसेंबर, २०१३ रोजी या मुलीचे क्षुल्लक कारणावरून आईशी भांडण झाले तेव्हा आदित्यने तिला भेटायला बाहेर बोलावले. नंतर तिला घेऊन तो पनवेल, पेण व नागोठणे येथे गेला. लॉजमध्ये राहून त्या दोघांनी शरीरसुख घेतले. पैसे संपले तेव्हा आदित्यने त्या मुलीच्या गळ्यातील सोन्याची चेन गहाण ठेवून पैसे उभे केले.

ही मुलगी आदित्यच्या खरंच प्रेमात पडली होती. त्यामुळे तो सांगेल तसे ती करत होती. चार दिवस ती स्वत:हून त्याच्यासोबत फिरली. परंतु तिकडे आईने मुलगी बेपत्ता झाल्याची पोलिसांत फिर्याद केली. तिलाही मोबाईलवर फोन केले. प्रकरण पोलिसात गेल्याचे कळल्यावर आदित्य घाबरला. त्याने त्या मुलीला वांद्रे येथे आणून सोडले. तेथून तिने आईला फोन केला. प्रकरण पोलिसांकडे गेले. पोलिसांनी आदित्यच्या मोबाईलचे ट्रेसिंग करून त्याची सर्व माहिती काढली. तो विवाहित आहे, त्याने आपल्याला फसविले, हे कळल्यावर त्या मुलीने चार दिवस त्याच्यासोबत जाऊन जे केले ते सर्व पोलिसांना सांगितले.

आदित्यला अटक झाली. कोर्टात त्या मुलीने आपण आदित्यशी स्वखुशीने शरीरसंबंध ठेवले असे सांगितले. पण ती अल्पवयीन असल्याने तिच्या संमतीला कायद्याच्या दृष्टीने काही किंमत नव्हती. कोर्टात आदित्यच्या बायकोचीही साक्ष झाली. त्यांच्या लग्नातील फोटो तिने कोर्टात सादर केला. त्या फोटोतील आई व बहिणीला आदित्यने ओळखले. पण पत्नीला ओळखत नसल्याचे सांगून त्याने लग्न दडविण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

अशा प्रकारे मनात प्रेमाविषयी तरल भावना असण्याच्या कोवळ्या वयातील मुलीच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन तिला दगा देणारा आदित्य गजाआड केला. अलीकडच्या काळात कोर्टात आलेली अशाच प्रकारचे कथानक असलेलेली ही चौथी केस होती. मुलांना या वयात मोबाईलचा वापर किती सावधपणाने करू द्यायला हवा, हेच या केसवरून अधोरेखित होते.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER