
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत कोरोना संदर्भात बैठक झाली. या बैठकीत कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही. मात्र, कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शाळा २१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्याने एकवेळ बंद राहणार आहे. सोबतच हॉटेल आणि मॉल रात्री १० पर्यंत सुरू राहणार, असे निर्णय बैठकीत घेण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक पुणे महापालिका विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थितीत होते.
कोरोनाची स्थिती
शहरात कोरोनाने पुन्हा एकदा वर डोके काढले आहे. तीन ते चार महिने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर शहरांत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. गुरुवारी १ हजार ५०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याआधी बुधवारी १ हजार ३५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. दुसरीकडे टेस्टिंगची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला