अर्णव गोस्वामींच्या याचिकेवर तातडीने अंतरिम दिलासा नाही

प्रतिवादींना नोटीस काढून शुक्रवारी सुनावणी

Arnab & HC

मुंबई : अलिबाग येथील एक कंत्राटदार अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या दोन वर्षांपूर्वी रीतसर बंद केलेल्या प्रकरणात अटक केलेले ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी यांनी केलेल्या याचिकेवर त्यांना दिलासा मिळेल असा कोणताही अंतरिम आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. महाराष्ट्र सररकार, पोलीस व मूळ फिर्यादी व अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता अशा सर्व प्रतिवादींना नोटीस काढून याचिकेवरील सुनावणी उद्या शुक्रवारी दुपारी ठेवण्यात आली.

न्या. संभाजी शवाजी शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे झालेल्या व्हर्च्युअल सुनावणीमध्ये अर्णव यांचे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी फक्त तातडीने अंतरिम आदेश देण्याचाच मुद्दा लावून धरला. ‘मला फक्त सात मिनिटे द्या. अंतरिम आदेश देऊन या प्रकरणाचा तपास थांबविणे का गरजेचे आहे, हे मी तुम्हाला पटवून देईन’, असे त्यांचे न्यायमूर्तींना सांगणे होते.

अ‍ॅड. पोंडा यांचा मुद्दा असा होता की, अन्वय नाईक यांनी दोन वर्षांपूर्वी आत्महत्या कली तेव्हा अलिबाग पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपास, सबळ पुरावे न मिळाल्याने ‘ए समरी’ दाखल करून बंद करण्यात आला होता. आता दंडाधिकाºयांकडून परवानगी न घेताच पुन्हा तपास सुरु करण्यात आला आहे. तो पूर्णपणे बेकायदा आहे. तो लगेच थांबवायला हवा. कारण अर्णव यांच्या प्र्त्येक दिवस  कोठडीत राहण्याने या बेकायदेशीरपणात भर पडत आहे.

ज्येष्ठ वकील हरीष साळवे हेही अर्णव यांची बाजू मांडायला उपस्थित होते. ते न्यायालयास एवढेच म्हणाले की, अंतरिम आदेश देऊन अर्णव यांना कोठडीतून सोडले तर महाराष्ट्रावर आभाळ तर नक्कीच कोसळणार नाही!. परंतु कोणताही अंतरिम आदेश न देण्यावर न्यायाधीश ठाम राहिले. ते म्हणाले की, आमच्याकडे इतरही प्रकरणे सुनावणीसाठी आहेत. आम्ही तुमच्या  विनंतीवर जरूर विचार करू. पण त्यासाठी प्रतिवादींना नोटीस देऊन त्यांचेही म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. याचिकेत दुरुस्ती करून मूळ फिर्यादी अक्षता नाईक यांनाही प्रतिवादी करण्यास सांगून खंडपीठाने त्यांनाही नोटीस काढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER