दहशतवादी आणि तृणमूलमध्ये काहीच अंतर नाही- चंद्रकुमार बोस

chandra-bose-Final Phase

भाटपाडा : तृणमूलच्या ‘जिहादी’ ब्रिगेडने भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे की, बुथ एजंट म्हणून मतदान केंद्रावर बसलात तर तुमचा खून करू. दहशतवादी संघटना आणि तृणमूलमध्ये काहीच अंतर नाही, असा आरोप भाजप उमेदवार चंद्रकुमार बोस यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वी पश्चिम बंगालमध्ये रात्री उशिरा पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला. भाटपाडा येथे भाजप कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेस कार्येकर्ते पुन्हा भिडले. या प्रकरणी चंद्रकुमार बोस यांनी तृणमूल काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.

२४ परगना जिल्ह्याच्या भाटपाड्यात शनिवार रात्री उशिरा जमावाने अनेक गाड्यांची तोडफोड केली. दोन गाड्यांवर बॉम्‍ब फेकले. दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत. दंगलखोरांनी अनेक भागांत जाळपोळ आणि दगडफेक केली. या भागात अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.