कोर्टांमध्येही भ्रष्टाचार चालतो हे सत्य नाकारता येणार नाही

मद्रास हायकोर्टाने व्यक्त केले ‘प्रांजळ’ मत

Justice SM Subramaniam - Madras High Court

चेन्नई : न्यायालयांची कार्यालये व परिसरातही भ्रष्टाचार चालतो व वाढत चालला आहे, हे सत्य नाकारणे विवेकबुद्धीला न पटणारे आहे, असे ‘प्रांजळ’ मत मद्रास उच्च न्यायालयाच्या (Madras High Court) एका न्यायाधीशाने गेल्या आठवड्यात दिलेल्या एका निकालपत्रात नोंदविले आहे.

लाच घेतल्याबद्दल नोकरीतून सक्तीने सेवानिवृत्त केलेल्या एका सरकारी अधिकार्‍याने केलेल्या याचिकेवरील निकालात न्या. एस.एम. सुब्रह्मण्यम यांनी वरील मत नोंदवत म्हटले की, भ्रष्टाचार सर्वच ठिकाणी चालतो, असे म्हणून न्यायालयांमधील भ्रष्टाचाराकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. कारण सामान्य माणूस सरकार दरबारी सर्व मार्ग खुंटले की मगच शेवटचा उपाय म्हणून न्यायालयात येत असतो. तेथेही त्याला तोच अनुभव आल्यास न्यायसंस्थेवरील त्याचा विश्वास तर उडेलच; पण राज्यघटनेने उभी केलेली न्यायाची सर्व व्यवस्थाच निरर्थक ठरेल. त्यामुळे न्यायसंस्था केवळ तत्पर व कार्यक्षमच नव्हे तर पूर्णांशाने भ्रष्टाचारमुक्तच असायला हवी.

न्यायमूर्तींनी असेही म्हटले की, न्यायालयांमध्येही अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी दक्षता विभाग ( Vigilance Dept. ) असतो. पण त्याने फारसा परिणाम होत असल्याचे दिसत नाही. या विभागाने अधिक दक्षतेने काम करण्याची व अचानक तपासण्या व धाडी असे उपाय प्रभावीपणे योजण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER