खडसेंच्या पक्षप्रवेशासाठी पवारांकडून कोणतीही अट नाही; पुढील महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश

Sharad Pawar & Eknath Khadse

जळगाव : भाजपच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारणीत जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना डावलल्यामुळे आता ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रवेशाबाबत आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने खडसे यांना पक्षात घेण्यासाठी काही अटी टाकल्याची चर्चा होती. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवारांकडून (Sharad Pawar) अशा कोणत्याही अटी टाकण्यात आल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. पुढच्या महिन्यात त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. याबाबतचे वृत्त सरकारनामाने प्रकाशित केले आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत पक्ष कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीला जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांची त्यांनी मते जाणून घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांनी खडसे यांच्या प्रवेशाला आक्षेप घेतला नाही. नेत्यांनी खडसे यांच्या प्रवेशाबाबत सकारात्मक भूमिका या नेत्यांनी घेतली होती. त्यामुळे खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार हे अखेर ठरले आहे.

खडसे यांच्या प्रवेशासाठी त्यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवल्याची चर्चा सुरू होती. मात्र, याबाबत जिल्ह्यातील नेत्यांकडून माहिती जाणून घेतली असता पवारांकडून खडसे यांच्यावर प्रवेशाबाबत कोणतीही अट ठेवण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. चर्चेवेळी पक्षातील काही नेत्यांनी ही मागणी केली होती. मात्र, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना फारसे गंभीरपणे घेतले नसल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीत खडसे नक्की केव्हा प्रवेश करणार याबाबत पक्षातील स्थानिक नेते अनभिज्ञ आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होऊन उत्तर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील महिन्यातील राजकीय घडामोडी जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप घडवणाऱ्या ठरणार आहेत. खडसे यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER