
मुंबई :-अपेक्षेनुसार रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपोदरात कोणतेही बदल न करता ते ४ टक्क्यांवर जैसे थे ठेवले आहेत. महागाईवाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikant Das) यांनी या निर्णयांची माहिती दिली.
रिव्हर्स रेपोदरही ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. बँक रेटमध्येही कोणतेही बदल करण्याचा निर्णय झाला नाही. ते ४.२५ टक्क्यांवर आणि कॅश रिझर्व्ह रेशो ३ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. पुढील काही महिने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे दास म्हणाले. तसेच पुढील तिमाहीत जीडीपीवाढीचा दर सकारात्मक राहण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. मात्र संपूर्ण वर्षासाठी जीडीपीवाढीचा दर उणे ७.५ टक्के राहण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. २ डिसेंबरपासून सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात झाली होती.
तिची सांगता झाली. रेपोदर कायम ठेवण्याचा निर्णय सर्व सदस्यांच्या संमतीने घेण्यात आल्याचेही दास यांनी सांगितले. सप्टेंबर २०२० मध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचा दर नकारात्मक राहिला आहे. मात्र अर्थव्यवस्थेची झपाट्याने सुधारणा होत आहे, असे त्यांनी सांगितले. महागाई नियंत्रण आणि विकासाला चालना देण्याबाबत बँक कटिबद्ध आहे. चालू तिमाहीत महागाई दर ६.८ टक्के राहील तर चौथ्या तिमाहीत तो ५.८ टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला