निधी आहे पण पालकमंत्री नाही.. विकासकामांना पालकमंत्र्यांची प्रतीक्षा!

ratnagiri

रत्नागिरी/प्रतिनिधी :  जिल्हा प्रशासनाकडे २०१९-२० या वर्षासाठी ११९ कोटींचा निधी प्राप्त असूनही पालकमंत्री जाहीर होण्यास विलंब झाल्याने जिल्हा नियोजनच्या विकासकामांना पुन्हा पालकमंत्र्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. नव्या पालकमंत्र्यांच्या उपलब्धतेनुसार येत्या अडीज-तीन महिन्यात हा निधी खर्ची टाकण्याचे नवे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या विकास कामांना उदय सामंत यांच्या रूपाने अध्यक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच अचानक रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदात बदल करण्यात आला. सामंत यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद तर अनिल परब यांना रत्नागिरीचे पालकमंत्रीपद घोषित करण्यात आले. पालकमंत्री पद घोषित होण्यास विलंब झाल्याने आता जिल्हा नियोजनच्या विकासकामांना पुन्हा पालकमंत्र्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

२०१९ – २० या आर्थिक वर्षासाठी २०१ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ११९ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. मात्र, या आर्थिक वर्षात लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुका आल्याने या निवडणुकांच्या आचारसंहितामुळे विकासकामे ठप्प झाली होती. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे कामे ठप्पच राहिली. आजमितीला जिल्हा नियोजनकडून ६७ कोटी ३५ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ४० कोटी रूपयांचा निधी विविध कामांवर खर्च झाला आहे. यावर्षी विकास योजनेच्या आराखड्यात १७ कोटी ८७ लाख रूपयांच्या निधीची वाढ झाली आहे. निधी खर्च करण्यासाठी विविध यंत्रणांच्या हातात आता केवळ अडीच -तीन महिनेच राहिले आहेत. त्यामुळे उर्वरित निधी खर्च करण्याचे यंत्रणांसमोर आव्हानच आहे. आता जिल्ह्याचे पालकमंत्रीच बदलल्याने पुन्हा जिल्ह्याला नव्या पालकमंत्र्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.