खरी गरज आहे आयएमडीच्या अभिनंदनाची…

IMD - Heavy Rains Editorial

Shailendra Paranjapeलहानपणापासून आपल्याला पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा…किंवा लहरी पाऊस, असं शिकवलं जातं. पण त्यामागची शास्त्रीय कारणं मात्र माहीत नसतात. लहानपणीच्या गाण्याकवितांमधून काही मूल्य, संस्कार अंगात बाणवण्याचे प्रयत्न कोलो जात असतात. तसंच वर्षानुवर्षांच्या लोकांच्या अनुभवांमधून वाक्प्रचार म्हणी तयार होतात. त्या प्रत्येक वाक्प्रचार वा म्हणी तयार कोणी केल्या हे शोधणं तसं अवघडच असतं.

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे गेल्या आठवड्याभरात पुण्याला पावसानं असं काही झोडपून काढलंय की, पाऊस हा भीती दाखवायचा शब्द झालाय.

ज्येष्ठ वैज्ञानिक वसंतराव गोवारीकर यांनी हवामान विभागातले संशोधक थपलियाल यांच्या योगदानातून सिद्ध झालेले गोवारीकर मान्सून मॉडेल हे सोळा निकषांचे मान्सून अंदाजाचे प्रतिमान किंवा गणिती मॉडेल तयार केले. तेव्हापासून सलग दशकभर गोवारीकर सांगतील तसा पाऊस देशात पडायचा.

हे सारं १९८० च्या १९९० च्या दशकाच्या काळात घडलं पण बिचाऱ्या हवामान खात्यावरची टीका काही कमी झाली नाही. काही सरकारी खातीच अशी आहेत की त्यांना कायम टीकेचं धनी व्हावं लागतं. जुन्या हिन्दी सिनेमात पोलिसांच्या गाडीचा सायरन हा हिरोनं सगळ्या गुंडांची धुलाई केल्यानंतरच वाजायचा आणि सायरन वाजला की प्रेक्षक द एंड आला म्हणून उठायला लागायचे, तसं काही खाती बदनाम आहेत, तर काहींची कायमच चेष्टा केली जाते.

मुळात इंडियन मान्सून किंवा भारतात बरसणारा मोसमी पाऊस, हा अंदाज वर्तवण्यासाठी फारच आव्हानात्मक बाब आहे. भारतात सियाचीनसारख्या अतिथंडीच्या उणे पन्नास पंचावन्न अंशांपासून ते राजस्थानसारख्या कच्छ वाळवंटाच्या पंचावन्न अंश तापणारे भूप्रदेश आहेत. डोंगर आहेत, सखल भाग आहेत, वाळवंटी प्रदेश आहेत आणि दुर्गम भागही आहेत. त्यामुळे दर बारा कोसांनी भाषा बदलते तसं हवामानाच्याही विविध लहरी बघायला मिळतात. त्यामुळं अंदाज वर्तवणंही अवघड, गुंतागुंतीचं आहे.

हवामान अंदाज चुकल्यानंतर शिव्याशाप खाण्याची, टीका झेलण्याची हवामान खात्याला सवय आहेच. पण गेल्या आठ दहा दिवसात यापूर्वी कधीही न आलेले समुद्रातून जमिनीवर येऊन पुन्हा समुद्रात गेलेले वादळ, कमी दाबाचे पट्टे आणि परिणामस्वरूप होऊ घातलेला मुसळधार पाऊस, या साऱ्याचे हवामान खात्याने दिलेले बहुतांश अंदाज अचूक ठरताहेत. यापूर्वी येऊन गेलेल्या संहारक निसर्ग चक्रीवादळाचे, त्याच्या प्रवासाचे अंदाजही अचूकच होते.

आपण भारतीय लोक यशाच्या सेलिब्रेशनमधे कमी पडतो, असं ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर नेहमी म्हणतात. परम महासंगणक विकसित केला गेला तो १९९१ मधे. तेव्हापासून डॉ. माशेलकर ही गोष्ट सांगतात कारण अमेरिकी वृत्तपत्रांनी परम महासंगणकाची बातमी अँग्री इंडिया मेक्स सुपर-कम्प्युटर, अशा मथळ्यांनी दिली होती पण भारतात मात्र त्याचं तितकसं कौतुक झालं नव्हतं.

त्यामुळे अंदाज बरोबर आले तर हवामान खात्याचं अभिनंदन करण्यातही आपण कंजूषपणा करता कामा नये, हे आता क्षणोक्षणी मोबाइलच्या बटणावर बोट असलेल्या नव्या पिढीनं लक्षात घ्यायला हवं. एक बोट आयएमडीच्या अभिनंदनासाठीही दाबायला हवं.

वर्षानुवर्षे टीका सहन करणाऱ्या हवामान खात्याच्या चांगल्या कामगिरीचं कौतुक करणारे मेसेजेस टाका, सोशल मिडियावर कृतज्ञता व्यक्त करा. जमलंच तर गप्पांमधे हे आवर्जून सांगा कारण आपल्या देशात काही खरं नाही, असा निराशावद बाळगणाऱ्या, जोपासणाऱ्या आणि पसरवणाऱ्यांना हेही समजायला हवं की इतक्या क्लिष्ट हवामानशास्त्रीय घटनांचे अंदाजही भारतात अचूक मिळतात.

कुडोज टू आयएमडी म्हणजे मोबाईलच्या भाषेत जमतील तेवढे अभिनंदनाचे अंगठ्यांचे साइन टू आयएमडी.

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER