मराठवाडयामध्ये खेळाडूंची खाण आहे- अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव

Shantaram Jadhav

नांदेड / प्रतिनिधी :- देशात कोणत्याही खेळामध्ये मराठवाडयातील खेळाडू मागे नाही. आपला खेळाडू हा कष्टाळू आहे. कुठेही गेला तरी तो स्वतःची ओळख निर्माण करतो. त्यामुळे मराठवाडयामध्ये खेळाडूंची खाण आहे, पण पुरेशा प्रशिक्षणा अभावी ते मागे पडत आहेत, असे मत कबड्डी खेळामधील भारत शासनाचा अर्जुन पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांनी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आज बुधवार, दि.18 सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये क्रीडा विभागातर्फे अखिल भारतीय अंतर विद्यापीठ व राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे मार्गदर्शक, व्यवस्थापक, प्राचार्य, क्रीडा शिक्षक यांचा गौरव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि एन. सरोदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.ज्ञानोबा मुंढे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ.विठ्ठलसिंह परिहार आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.शिवराज बोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, प्रत्येक खेळामध्ये खेळांचे उपकरणे असतात. पण कुस्ती आणि कबडी हे दोनच खेळ असे आहेत ज्यामध्ये बाह्य उपकरणांचा वापर केल्या जात नाही. ते आपल्याला आपल्या शरीर यष्टीद्वारे आतच घडवावे लागतात. खेळाडूंनी नेहमी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. नेहमी झाडाच्या शेंडयाची फळ तोडण्याचा प्रयत्न करा म्हणजे आदली मधली फळे सहज तुम्हाला मिळतील, असा संदेशही यावेळी त्यांनी दिला.

यावेळी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावरील सदस्य, विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांच्यासह विद्यापीठातील संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पृथ्वीराज तौर आणि डॉ.राजेंद्र गोणारकर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.शिवराज बोकडे यांनी मानले.