एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही; नाना पटोलेंचा मोदींना टोला

Nana Patole - PM Modi - Maharashtra Today
Nana Patole - PM Modi - Maharashtra Today

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली, सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशाची झालेली स्थिती पाहून सुप्रीम कोर्टानेही, “देशाच्या जनतेला मरायला सोडलं आहे का?” असा संतप्त सवाल केला. अनेक गावं स्मशान झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे. आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. सध्या तरी लसीकरण हाच यावरील प्रभावी उपाय ठरत आहे. पण केंद्र सरकारने आपल्या देशातील लस दुसऱ्या देशांना पाठवली. ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांनाही ४.५ कोटी लसी दिल्या. एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही, असा खरमरीत टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लगावला.

महाराष्ट्रदिनानिमित्त प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, राज्यासमोर आर्थिक संकट असतानाही १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने हाती घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला हातभार लावण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शेजारच्या गोरगरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा व त्या कुटुंबांच्या लसीकरणाचा खर्च उचलून ती रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करावी, असे आवाहन नाना पटोले (Nana Patole) यांनी केले. कोरोना हे देशावर आणि राज्यावर आलेले अभूतपूर्व संकट आहे. दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहावत नाही. या संकटाचा सामना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार वर्षभरापासून मोठ्या धैर्याने करत असून केंद्र सरकारने आपली जबाबदारी झटकली असली तरी महाराष्ट्र सरकारने मात्र जनतेला वाऱ्यावर न सोडता १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मदतीचा ओघ वाढला पाहिजे. काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पाच लाख रुपये अशी मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीला केली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात कोविड  साहाय्यता   केंद्राची स्थापना करून गरजू रुग्णांना बेड्स मिळवून देणे, वैद्यकीय  साहाय्यता  पुरवणे याबरोबरच रक्तदान शिबिरे आयोजित करून मदतीचे कार्य सुरू ठेवले आहे. लसीकरणाचा खर्च मोठा आहे.  त्याला हातभार म्हणून काँग्रेस कार्यकर्ते आपल्या परिसरातील गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःच्या व त्या कुटुंबाच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देणार आहेत. यासोबतच नोंदणी करून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्ते लोकांना मदत करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, यशवंत हाप्पे, राजन भोसले, डॉ. गजानन देसाई, प्रवक्ते सचिन सावंत, अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे सचिव राजाराम देशमुख, मेहुल वोरा, झिशान अहमद, रमेश कीर, प्रमोद मोरे, डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button