करोनाच्या अंधारातही काही दिवे आहेत…

Maharashtra Lockdown - Coronavirus Vaccination - Editorial

Shailendra Paranjapeराज्यामधे करोनाचे (Corona) रुग्ण भयावह वाटावे इतक्या संख्येने वाढत आहेत. गेल्या महिनाभरात करोनाचे रुग्ण मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय यांच्यातले जास्ती प्रमाणात असल्याचे वाटत होते आणि त्यातही वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे नोकरीसाठी बाहेर फिरणारे पंचवीस ते साठ वयातले नागरिक हे करोनामुळे संसर्गबाधित होत आहेत, असे दिसत होते. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे पंचवीस वयावरच्या सर्वांना करोनाची लस द्यावी, ही मागणी केली आहे. तीच मागणी कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांकडे पत्र लिहून केली आहे. पण ताज्या वृत्तानुसार करोनाच्या रुग्णसंख्येत ज्येष्ठांची म्हणजे साठ वयावरच्यांची संख्याही आता वाढतेय. त्याबरोबरच पुण्यात रविवारी रुग्णसंख्या सहा हजारांच्या वर गेलीय आणि ११६ जणांचा दिवसात मृत्यू झालाय, हीदेखील चिंतेचीच बाब आहे.

शुक्रवार संध्याकाळपासूनचा वीकेंड लॉकडाऊन (Lockdown) कडक पाळला जातोय आणि शनिवारी रविवारी त्या प्रमाणात दुकानंही खुली नाहीत आणि रस्त्यावरही शुकशुकाट जाणवत होता. पण सोमवार उजाडला की जणू काही सारे निर्बंध संपलेत, अशा थाटात लोक हातात पिशव्या घेऊन घराबाहेर फिरताना दिसताहेत. ही खूपच गंभीर बाब आहे. अद्यापही पोलिसांकडून खूप कडकपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी झालेली दिसत नाहीये आणि पोलिसांनी लोकांना मारावे, ही अपेक्षाही नाही. वास्तविक गेल्या वर्षीच्या कडक ल़ॉकडाऊनच्या वेळी पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला होता आणि त्यामुळे नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल प्रतिकूल भावनाही झाली होती. पण मुळात लोकांनी रस्त्यावर फिरू नये, यासाठी प्रतिबंधक काम करावे, हे पोलिसांचे मूळ काम नाहीच. त्यांच्यावर ते करण्याची वेळ येणं, ही आपण सारे नागरिक म्हणून बेजबाबदार असल्याचीच पावती आहे.

महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंधरवड्याचा लॉकडाऊन जाहीर करताना केलेल्या घोषणा कन्फ्युजिंग किंवा गोंधळ निर्माण करणाऱ्या आहेत, ही टीका याच लेखमालेतूनही केली होती. पण तरीही दैनंदिन जीवनाच्या काही क्षेत्रातले व्यवहार सुरू ठेवण्यात आले आहेत आणि त्यामागे अर्थचक्र थांबता कामा नये, ही भूमिका घेण्यात आलीय ती कदाचित चुकीची आहे की काय, असे वाटावे अशी स्थिती आहे. कारण अर्थचक्राला खीळ बसलेली आहेच पण करोनाचा संसर्गही कमी झालेला नाही. त्यामुळे कदाचित १ मे २०२१ या महाराष्ट्र दिनाला राज्यभर संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची वेळ येणारच नाही असे नाही. तो लावला जावा की नाही, हे सर्वस्वी आपल्या सर्वांच्या वागण्यावर म्हणजे विनाकारण घराबाहेर जाण्याच्या अनाठायी उत्साहावर अवलंबून आहे.

एकीकडे करोनाचे रुग्ण वाढताहेत, रेमडिसिव्हरचा (Remdesivir) काळा बाजार होतोय आणि रेमडिसिव्हरवरून राजकीय धुळवड सुरू असताना पुण्यात धनकवडी भागात एक माणुसकी जिवंत आहे, याचा प्रत्यय देणारी घटना घडलीय. लशीकरणासाठी पंचाहत्तरीच्या वरचे एक वृद्ध आणि एक वृद्धा तेथे आले होते आणि त्यांना गुडघ्याला त्रास होत असल्याने काही पायऱ्या चढून लशीकरण केंद्रात जाणे जवळपास अशक्य होते. त्यामुळे फोनवरून संपर्क साधल्यानंतर अखेर लशीकरण केंद्रातल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्या दोघांनाही खाली रस्त्यावर येऊ करोनाची लस दिली. सध्या कुणासाठीच कुणाला थांबायला वेळ नाही, अशी स्थिती असताना आणि सगेसोयरेही करोना झाल्यानंतर अतिदूर गेल्याचे वातावरण असताना रक्ताच्या नात्याचा संबंध नसलेल्या या करोना योद्ध्यांनी रस्त्यावर येऊन ज्येष्ठ नागरिकांना घडवलेले माणुसकीचे दर्शन म्हणजे अजून सारे संपलेले नाही आणि अंधार फार झाला तरी एखादी पणती लावणारेही आहेत, याचीच साक्ष पटवणारे आहे.

करोना कितीही भयानक पद्धतीने वाढत असला तरीही सध्याच्या लॉकडाऊनच्या परिणामी १५ मेनंतर रुग्णसंख्या कमी होईल, असं भाकीत राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केलेय. त्यामुळे १ मे नंतर कडक लॉकडाऊन लावला गेला तरी त्याची तयारी ठेवायला हवी कारण हे सारे आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच आहे. त्यामुळे करोनाचे निर्बंध, काळा बाजार, राजकारण यापेक्षाही रस्त्यावरयेऊन इंजेक्शन देणारे कर्तव्यतत्पर आपल्यात आहेत, हे सर्वांनी समजून घ्यायला हवे आणि आपणही आपापले कर्तव्य प्रसंगी आऊट ऑफ द वे जाऊन बजावायला हवे.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button