अपात्रतेची शिक्षा झालेले जोकोविचशिवाय इतरही आहेत

Novak Djokovic

जगातील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोवीचला (Novak Djokovic) युएस ओपन स्पर्धेच्या (US open tennis) आयोजकांनी अपात्र (Default) ठरविल्याने टेनिस जगतात खळबळ आहे. अजणातेपणाने फटकारलेला चेंडू मैदानातील लाइन जज (Line Judge) महिलेला लागल्यानंतर जोकोवीचला स्पर्धा आयोजक युएस टेनिस असोसिएशनने (USTA) थेट बाहेरचाच रस्ता दाखवला. ही घटना जाणिवपूर्वक झालेली नसल्याने ही कारवाइ जरा अतिरेकीच वाटत असली तरी नियमांनुसार स्पर्धा रेफरींकडे (Tournament Referee) दुसरा कोणताच पर्याय नव्हता असे जाणकारांचे म्हणणे आहे मात्र अशाप्रकारे अपात्रतेची शिक्षा झालेला जोकोवीच हा एकमेव खेळाडू नाही. त्याच्याआधीही डेव्हिड नालबंडीयन (David Nalbandian) , टीम हेनमन (Tim Henman), डेनिस शापोव्हालोव्ह, जॉन मॅकेन्रो हे वेगवेगळ्या कारणांसाठी अपात्रतेला सामोरे गेले आहेत.

सामन्यात कामगिरी चांगली होत नसेल तर कधी कधी खेळाडूंचा संताप अनावर होतो आणि त्यातून त्यांच्याकडून असे काही प्रकार घडतात की नियमभंग झाल्याने त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागते.

नोव्हाक जोकोवीच

ताज्या घटनेने नंबर वन नोव्हाक जोकोवीचच्या यंदाच्या सलग २६ सामने जिंकून अपराजित राहण्याच्या पराक्रमावर पाणी फेरले. र्चौथ्या फेरीच्या या सामन्यात १० व्या गेममध्येही जोकोवीचचा संताप दिसून आला होता. त्याने कोर्टलगतच्या फलकांवर चेंडू फटकावला होता पण त्याला त्यावेळी ताकिद देण्यात आली नव्हती. मात्र याच्या तीनच गुणानंतर जोको घसरुन पडला आणि त्याच्या खांद्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याचा प्रतिस्पर्धी स्पेनचा कॅरेनो बस्टा ६-५ असा आघाडीवर गेला आणि जोकोवीचने निराशेत चेंडू रॅकेटने पाठीमागे बेसलाइनकडे फटकारला. नेमका हा चेडू तिकडे उभ्या लाइन जज महिलेच्या मानेवर जाऊन आदळला. त्यात त्या महिलेला क्षणिक त्रासापलिकडे फार काही इजा वगैरे झाली नसली तरी जोकोवीचला थेट स्पर्धेतून बाद करण्यात आले.

डेनिस शापोव्हालोव्ह

त्याआधी डेव्हिस कप जागतिक गटाच्या २०१७ मधील सामन्यात कॅनडाच्या डेनिस शापोव्हालोव्हवर अशीच कारवाइ करण्यात आली होती. ब्रिटनच्या कायले एडमंडविरुध्दचा तो सामना लढतीचा पाचवा आणि निर्णायक सामना होता. त्यावेळी शापोव्हालोव्ह फक्त १७ वर्षांचा होता आणि तो दोन सेट गमावून तिसºया सेटमध्येही पिछाडीवर होता. त्यामुळे त्याचा झाला संताप आणि त्याने चेंडू भिरकावला गॅलरीच्या दिशेने पण दुर्देव शापोव्हालोव्हचे की चेंडू गॅलरीत न जाता पंच अर्नाड गबास यांच्या डोळ्यांवर लागला. शापोव्हालोव्हने लगेच पंचांची चौकशी केली पण त्याला अखिलाडूवृत्तीच्या वर्तनासाठी अपात्रतेच्या शिक्षेला सामोर जावेच लागले शिवाय ७ हजार डॉलरचा दंडसद्धा करण्यात आला. सुदैवाने त्या पंचाच्या डोळ्याला इजा झाली नाही.

डेव्हिड नालबंडीयन

२००२ च्या लंडन क्वीन्स क्लब स्पर्धेत अर्जेंटिनाच्या डेव्हिड नालबंडीयनला अशीच शिक्षा झाली. अंतिम फेरीच्या मारिन सिलीच विरुध्दच्या सामन्यात डेव्हिडने पहिला सेट टायब्रेकरमध्ये घेतला आणि दुसºया सेटच्या सातव्या गेममध्ये सिलीचने त्याची सर्व्हिस ब्रेक करत ४-३ अशी आघाडी घेतली.त्यावेळी नालबंडीयनने संतापात लाइनमनच्या खूर्चीभोवतीच्या जाहिरात फलकाला लाथ मारली आणि त्या ठोशाने तो फलक फाटून लाइनमनच्या नडगीला दुखापत झाली होती. त्यामुळे साहजिकच नालबंडीयनला अपात्र ठरविण्यात आले होते.

टीम हेनमन

१९९५ च्या विम्बल्डन स्पर्धेत ब्रिटनचा टीम हेनमन हा दुहेरीत जेरेमी बेटससोबत खेळत होता. त्यांचा सामना हेन्रिक होल्म व जेफ टरँगो यांच्याशी होता. त्यात चौथा सेट ६-६ असा बरोबरीत असताना टायब्रेकरमध्ये हेनमनच्या संतापाचा भडका उडाला आणि त्याने हातातील चेंडू जोराने फटकावला. त्याचवेळी नेमक्या तेथून जाणाºया बॉलगर्ल कॅरोलीन हॉल हिच्या कानाजवळ तो चेंडू आदळला. त्यानंतर कॅरोलीन धीराने आपल्या जागेवर गेली पण वेदनांपोटी तिच्या डोळ्यात अश्रू होते. त्यामुळे हेनमन व बेटस् जोडीला स्पर्धेतून बाद करण्यात आले होते. त्यानंतर दुसºया दिवशी हेनमनने कॅरोलीनचे भेट घेत तिला पुष्पगुच्छ दिला होता.

जॉन मॅकेन्रो

आपल्या तापट स्वभावासाठी प्रसिध्द अमेरिकन टेनिसपटू जॉन मॅकेन्रोलाही १९९० च्या आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये अशाच शिक्षेला सामोरे जावे लागले होते. मिकाएल पेर्नफोर्सविरुध्दच्या सामन्यात तिसºया सेटमध्ये लाइनवूमनला त्याने रागावल्याचा प्रकार घडला. त्यावेळी पंचांनी मॅकला ताकिद दिली होती. त्यानंतर चौथ्या सेटच्या सातव्या गेममध्ये दोन फटके मारू न शकल्यावर संतापात दोन्ही वेळा मॅकेन्रोने रॅकेट आपटली. यावेळी पंचांनी त्याला पुन्हा ताकिद देत एक गुणाचा दंड केला. मात्र मॅकने समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय पंचाशी वाद घातल्यावर परतताना त्याने अपशब्दसुध्दा वापरले होते. त्याची ही मुक्ताफळे सर्वांना ऐकू आली होती आणि पंच आर्मस्ट्राँग यांनी त्याला सामना व स्पर्धेसाठी अपात्र घोषित केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER