कोर्टातील कामकाजाच्या प्रसिद्धीस माध्यमांवर कोणतीही बंधने नाहीत

Supreme Court - Media
  • सुप्रीम कोर्ट म्हणते हा माध्यमांचा मूलभूत हक्क

नवी दिल्ली : अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये माध्यमांच्या स्वातंत्र्याचाही समावेश होतो. त्यामुळे न्यायालयांमध्ये खुल्या पद्धतीने सुरु असलेल्या कामकाजाच्या त्याच वेळी किंवा नंतर बातम्या देण्यात माध्यमांवर कोणतेही बंधन नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी दिला. अशा वृत्तांकनामध्ये न्यायाधीशांनी तोंडी केलेल्या शेराबाजीचाही समावेश होतो, असेही न्यायलयाने नमूद केले.

न्यायालयाने म्हटले की, खुल्या पद्धतीने केले जाणारे न्यायदान हा आपण स्वीकारलेल्या व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. जे न्यायालयात प्रत्यक्ष हजर नाहीत त्यांना माध्यमांनी न्यायालयीन कामकाजाची माहिती बातम्यांच्या रूपाने देणे हा एका परीने खुल्या न्यायालयाचाच विस्तार आहे. शासन व्यवस्थेच्या प्रत्येक अंगावर नियंत्रण राहावे, हेच संविधानास अपेक्षित आहे. माध्यमांच्या बातम्यांमुळे न्यायसंस्था लोकांप्रती उत्तरदायी होते. न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, हल्ली लोकांचा कल डिजिटल माध्यमांकडे अधिक आहे. त्यामुळे लोक माहितीसाठी इंटरनेटचा वापर करत असतात. ही नवी माध्यमे लगेचच्या लगेच माहिती पुरवतात. त्यांच्यावर बंधने घालता येणार नाहीत.

निवडणूक आयोगाने केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) फेटाळताना न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आयोगाविरुद्ध अत्यंत तिखट शब्दांत तोंडी ताशेरे मारले होते. त्याविरुद्ध आयोगाची ही याचिका होती. त्यात आयोगाने न्यायाधीशांच्या तोंडी मतप्रदर्शनाला प्रसिद्धी देण्यास माध्यमांना मनाई करावी, अशी मागणी केली होती. निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेने अशा गोष्टींना आक्षेप घेण्याखेरीज इतरही करण्यासारखे बरेच काही आहे, असा शेराही खंडपीठाने मारला.

देशात कोरोनाची दुसरी लाट यायला सर्वस्वी तुम्ही (निवडणूक आयोग) जबाबदार आहात. खरे तर तुमच्या अधिकार्‍यांविरुद्ध मनुष्यवधाने गुन्हे नोंदवायला हवेत, असे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. संजीव बॅनर्जी म्हणाले होते. हा शेरा तोंडी मारलेला असल्याने तो काढून टाकण्याची मागणी निरर्थक आहे, असे खंडपीठाने म्हटले. तरीही न्यायाधीशांनी बोलताना संयम बाळगायला हवा, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button