असे “पुस्तक प्रेमी ” आहेत अजून येथे !

There are more book lovers here!

फ्रेंडस् !” ग्रंथ माझे गुरु, ग्रंथ कल्पतरू ,सुखाचे सागरू, ग्रंथ माझे !”अशा संतांच्या रचनापासून ते थेट “वाचाल तर वाचाल” इथपर्यंत वाचनाचे महत्त्व सांगणारे अनेक सुविचार आपण ऐकत असतो. पण पुस्तके तितक्याच उत्सुकतेने वाचली जातातच असही नाही . आता तर सोशल मीडियाने बोटांनी पाने सरकवत, क्लिक करत पुस्तक वाचायला शिकवलय.

आज जागतिक पुस्तक दिवस. युनेस्कोकडून सुरू झालेला उत्सव म्हणूया याला ! 23 एप्रिल 1995 या दिवशी विल्यम शेक्सपियर ,इंका गारसीलोसो या व्यक्तींच्या सन्मानार्थ हा दिवस पाळला जातो. पुस्तके आणि लेखक यांच्या कौतुकासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा साजरा केला जातो, आणि वाचन आनंदाचा शोध लहान मुलांना लागावा, बच्चेकंपनी वाचनासाठी प्रवृत्त व्हावी हा पण त्यामागे उद्देश होताच.

आजही याचं हेतूने हा’ जागतिक पुस्तक दिन,’ तरुण आणि मुले ,याचप्रमाणे विविध लेखक, प्रकाशक पुस्तकांची दुकानं, वाचनालय यांच्या माध्यमातून साजरा केला जातो. यालाच ‘ लेखन हक्क दिन ‘ असंही म्हटलं जातं.

एकूणच वाचन करायचं कशाला ? लेखक लिहितो कशाला? यांबाबत अनेकानेक विचार असतात. एखादी संकल्पना किंवा विचार रुजविण्यासाठी, काही गोष्टींच्या जागृतीसाठी किंवा समर्थनार्थ, काही भावना, विचार व्यक्त करण्यासाठी ,त्याच बरोबर मनोरंजनासाठी वाचन किंवा लेखन केले जाते. व्यक्ती कोणत्या परिस्थितीत लहानाचा मोठा झाला याचाही पगडा लिखाणावर बरेचदा असतो .पण हे तेवढ्यावरच थांबत नाही, तर व्यक्ती प्रगल्भतेने नुसार’ आऊट ऑफ द वे ‘जाऊन विचार करत जातो, विचारांच्या कक्षा रुंदावत जातात ,त्याच प्रमाणे मग वाचनाचे अनेक पैलू हळूहळू आपल्या परिचयाचे होऊ लागतात. अनेक प्रकार ,अनेक संस्कृतींचे वर्णन, अनेक अनुभव, याची ओळख आपल्याला पुस्तके करून देऊ लागतात. वयाच्या वाढीप्रमाणे, केवळ वाचन विषयच बदलत जातात असं नाही ,तर त्याकडे बघण्याचे दृष्टीकोण देखील बदलत जातात. आणि त्यामुळे त्या पुस्तकांमधला अर्थही वेगळाच सापडत जातो.

थोडक्‍यात माणसाची प्रगल्भतेकडे ,परिपूर्णतेकडे वाटचाल आणि वाचत असलेल्या पुस्तकांचा प्रवास हातात हात घालूनच होत जातो. सुरुवातीला बडबड गीते, मग इसापनिती ,परिकथा, पंचतंत्र नंतर साहस कथा, प्रवास वर्णन, आत्मचरित्र, वेड लावणाऱ्या कविता, काही मूड गुलाबी करणाऱ्या कादंबऱ्या, कुठेतरी इंग्रजी पुस्तकांची लागलेली ओढ. असा प्रवास चालू असतानाच कधीतरी थोडं संसार व्यवहाराला लागाव लागतं आणि काही काळ वाचनाची गाडी धाडकन खाली आपटते. एके दिवशी अचानक वाटतं की ,”त्यात काय पडलेलं नाही !” त्याच वेळी पलंगावर पालथे पडून पुस्तकात गढून जाण्याला आई का ओरडायची ते कळतं. गॅसवर दूध तरी उतू जातं किंवा कंपनीची बस तरी चुकते. अर्थात दरम्यानच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ,लोकसत्ता यासारख्या वृत्तपत्रातून किंवा मासिकांमधून वाचनाची जाण किंवा वाचनाची चांगली’ टेस्ट ‘तयार झालेली असते.

मग पुस्तकांची ही मोहमयी दुनिया फार काही स्वस्थ बसू देत नाही. आणि परत वाचलेली पुस्तके वाचणे सुरू होते, मृत्युंजय ,राजा शिवछत्रपती, पु ल देशपांडे यांची पुस्तके, गो नी दांडेकर यांची पुस्तके यांच्या बरोबरच काही भाषांतरित पुस्तके पण आपल्या विश्वात प्रवेश करतात आणि अगदी इरावती कर्वे यांच्यापासून आत्ताच्या To kill a mockingbird पर्यंत आपला मोकाट वावर सुरू होतो.

हळू हळू देव , अध्यात्म यात काय पडले ? त्यात काय अर्थ आहे ?असं म्हणणारी विशिष्ट वयाची पिढी, काहीएक वय ओलांडते, आणि मग याबाबत येणारे अनुभव, हे अनुभव न राहता” अनुभूती ” बनतात .मग संतांच्या अभंगातील भावयुक्त,प्रेममय भक्ती प्रत्यक्ष डोळ्यातून उतरते, झरायला लागते. सर्वसाधारणपणे वाचनाचा प्रवास सगळ्यांचा ह्या पद्धतीने होतो.

काय नाही करत ही पुस्तक ? जगताना ही पुस्तक आपल्या बरोबर असतात. ते दिशा दाखवतात. कधीकधी जगण्याकरिता बळही देतात, निराशेतून बाहेर पडण्याची ऊर्जा देतात, एकाकी पडलेल्या माणसाला सोबत करतात. असं त्यांच्याबरोबरच आपलं नातं घट्ट होत जातं. ते आयुष्याचा एक अविभाज्य कप्पा बनतात.

फ्रेंड्स ! बरेचदा’ दिवस’ तर खूप वेगवेगळे साजरे केले जातात. पण प्रत्यक्ष कृती घडताना दिसत नाही. आणि म्हणूनच ” क्रियेवीण वाच्याळता व्यर्थ आहे” ही उक्ती खरी करणाऱ्या एका समूहाची ओळख या पार्श्‍वभूमीवर करून द्यावी असं मला वाटतं .अवघ्या महाराष्ट्रातील वाचक रसिक ज्यात समाविष्ट आहेत ,असा तब्बल ११४ रसिकांचा हा समूह आहे. रसिकांचा या अर्थी की यामध्ये केवळ वाचन प्रेमिचं आहेत असे नाही तर ,संगीत,नाटक चित्रकला,फोटोग्राफी ,लेखक ,कवी ,चित्रपट निर्माते,अनुवादक,कीर्तनकार,ब्लॉग लिहिणारे अश्या अनेक क्षेत्रातील प्रवीण मंडळी या व्यासपीठावर एकत्र आलेली आहेत ,आणि तरीही पुस्तक परिचय आणि त्यावरील प्रतिक्रिया व चर्चा या हेतूच्या परिघापलीकडे कोणी ठरवून जात नाही . येथील अलिखित नियम म्हणजे दुपारी चार पर्यंत पुस्तक परिचय ,त्यावर चर्चा आणि त्यानंतर खुले व्यासपीठ ! हा नियम लिखित नियमा पेक्षाही कणभर जास्तच पाळला जातो.

या समूहाचे समूह संचालक श्री कृष्ण दिवटे,राहणार कोल्हापूर .हे बँक ऑफ इंडियात डेप्युटी झोनल मॅनेजर होते. श्री अनंत मिसे आणि श्री प्रसाद नातू यांनी हा उपक्रम श्री दिवटे सरांशी बोलून दाखवला. केवळ वाचन संस्कृती रुजवण्यासाठी हा उपक्रम सुरू झाला .आणि त्यानंतर सलग १० महिने श्री .दिवटे हे, हा कार्येक्रम चालवत आहेत. मागील ४५ आठवड्यांमध्ये सलग ३१३ दिवस ,३१३ पुस्तकांचा परिचय या समूहातून फेसबूक वर करून देण्यात आले. समूहातील सदस्यांसाठी स्वतंत्र व्हाट्सअपग्रुप देखील आहे.

सदस्यांतीलच एका वाचकाने सोमवार ते रविवार असे सलग सात दिवस फेसबुक वर सात वेगवेगळ्या, स्वतःला आवडणाऱ्या पुस्तकांबद्दल लिहावयाचे आणि त्याच बरोबर पुस्तकाचं मुखपृष्ठ हेदेखील पोस्ट करायचं. अशी साधारण पद्धत आहे. मात्र पुस्तकाची भाषा, विषय याबाबत कोणतेही बंधन नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक क्षेत्रातील अनेक तज्ञ, आणि कलाकार मंडळी यात आहेत .दुबई,लायबेरिया,मुंबई ,पुणे, औरंगाबाद, कुडाळ ,चिपळूण,नागपूर, कोल्हापूर,बेंगलोर ,बिलासपूर येथील अनेक सदस्यांनी पुस्तक परिचय करून दिलेला आहे.

बराच जणांना लिहिण्याचा पहिला अनुभव असतो. मात्र तो समृद्ध करत जातो. आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून फिअर झोन, लर्निंग झोन, पासून ग्रोथ झोन हा प्रवास करताना देखील मजा येते. कारण प्रत्येक सभासदाला मिळणारी मनःपूर्वक दाद,कौतुक ,प्रोत्साहन !

मुख्य म्हणजे अनेक समूहांमध्ये ज्याप्रमाणे गुड मॉर्निंग ,गुड नाईट, वाढदिवस, शुभेच्छा किंवा श्रद्धांजली त्यांचे पीक असते .त्याप्रमाणे इथे या सगळ्याचा अभाव आहे. हे देखील सगळ्या सभासदांकडून अतिशय प्रामाणिकपणे पाळले जाते, याला कारण बोलण्यासारखे आणि लिहिण्यासारखे इतके काही वाचलेले असते, बघितलेले असते, की या वाचन अमृताची गोडी कशी आणि किती चाखू असा प्रश्न पडतो. विविध क्षेत्रातील ,विविध प्रदेशातले या कुटुंबात असल्याने विषयांचे वैविध्य कायम राहते. इतक्या उत्तम तर्‍हेने चाललेल्या या ग्रुपच्या कार्याचे श्रेय अर्थातच श्री कृष्णा दिवटे सरांच्या नेतृत्वाला जाते. पुढील आठवड्यातील पुस्तक परीक्षण कोणाचे ? याबाबतीत महिना महिना आधी केलेले नियोजन अतिशय कौतुकास्पद असते, आणि दिवसेंदिवस नवीन सभासद जोडत जाण्याचे कौशल्यही याला जबाबदार आहेच. मुख्य म्हणजे यात चार वाजता होणा रा हवालदार सरांचा चहा , जोडीला चमचमीत असा काही सदस्यांचा खोडसाळपणा, आणि हास्याची लयलूट ! पण हे देखील मर्यादित .यामुळे हा ग्रुप सदैव हसत खेळत आणि आपुलकीच्या ओलाव्याचा शिडकावा असावा तसा ताजातवाना असतो.

फ्रेंड्स ! आज-काल पानेच्या पाने वाचली जातात केवळ बोटाच्या क्लिक मधूनच ! आजकाल अस्वस्थ पुस्तके कपाटाच्या काचेतून बघत असतात .धूळ बसलेली ,महिनोंमहिने बाहेर न पडलेली, एकाकी पुस्तके आणि त्यांचे हुंदके अलगद ऐकू येतात अचानक ! तेव्हा त्यांना सांगावस वाटत,. की असे “पुस्तक प्रेमी “आहेत अजून येथे,ज्यांना कोऱ्या करकरीत पुस्तकांचा गंध मोहवतो,जुन्या पुस्तकातील पिंपळपाने आणि मोरपिसे यांच्यावरून अलगद हात फिरवून भूतकाळात रममाण व्हायला आवडते,कवितेतील शब्दांना दाद द्यावीशी वाटते .

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button