…मग मुख्यमंत्री केवळ तीन तासांच्याच दौऱ्यावर का? फडणवीसांचा सवाल

Maharashtra Today

रत्नागिरी :- तौक्ते चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) पाच राज्यांमध्ये धडक देत मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. महाराष्ट्रात याचा सर्वात मोठा फटका कोकणाला बसला. तर गुजरात राज्यामध्येही अतोनात नुकसान करुन गेला. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) केवळ गुजरातचा दौरा केला. सोबतच १००० कोटींची मदतही जाहीर केली. या मुद्द्यावरुन शिवसेनेने आणि विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान देशाचे असतात. मग गुजरातवरच एवढे प्रेम कसे? असा प्रश्न विरोधक उपस्थिती करत आहेत. आता विरोधकांच्या या प्रश्नाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सडेतोड उत्तर दिले.

पंतप्रधान गुजरातमध्येच का गेले असा प्रश्न उपस्थित करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोकणातील केवळ दोनच जिल्ह्याच्या दौऱ्यावर का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही?, असा उलटप्रश्न करतानाच मुख्यमंत्री केवळ विधाने करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस आज देवगडच्या दौऱ्यावर असून त्यांनी बंदरावर येऊन मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा टोला लगावला.

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान गुजरातमध्येच का गेले, ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मग मुख्यमंत्रीही कोकणातील केवळ दोनच जिल्ह्याच्या दौऱ्यावर का आले? चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांनाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?, आम्हीही असाच प्रश्न उपस्थित करायचा का? असे म्हणत गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची कुठलीही मदत सरकारने केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय विधाने करत आहेत.

मुख्यमंत्री म्हणतात संकटकाळात राजकारण करू नका आणि प्रत्यक्ष टीका करताना दिसत आहेत. मला राजकीय विषयांवर भाष्य करायचे नाही. पण मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?, असा सवाल करतानाच पण मुख्यमंत्री आले हे ठिक झालं आहे, असंही ते म्हणाले.

वादळाचा अलर्ट असतानाही देवगडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला. कोकणात मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे कधी होणार? नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार? बोटींचाही पंचनामा झालेला नाही, असं सांगतानाच अधिकाऱ्यांनी केवळ कागदावर नुकसानीचे आकडे दाखवले आहेत. तेही अत्यंत कमी आकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर वचक ठेवायला हवा, असं फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : फडणवीस आले म्हणून नाईलाजाने मुख्यमंत्र्यांना कोकणात यावं लागलं, निलेश राणेंचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button