…तर बाळासाहेब ठाकरे आपल्याला दिसूनही आले नसते – प्रकाश आंबेडकर

Balasaheb Thackeray - Prakash Ambedkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि डावे प पक्षांसाठी मी अस्पृश्य झालेलो आहो. त्यामुळेच ते मला भाजपाकडे ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मला जर भाजपामध्ये (BJP) जायचंच असेल, तर मला रोखणार कोण आहे? मी स्वतःचा मालक आहे. भाजपासोबत जायचं की नाही हा माझ्या पक्षाचा निर्णय आहे. मी भाजपासोबत गेलो, तर काँग्रेस काय करणार आहे? असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि डाव्या पक्षांना लक्ष्य केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या संवादमालेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज संवाद साधला.

यावेळी आंबेडकर म्हणाले, मी भाजपाला मदत करत असल्याचा आरोप केला जातो, तर दुसरीकडे अर्बन नक्षल्यांचं समर्थन करत असल्याचेही सांगण्यात येते. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमध्ये मी एकमेव व्यक्ती होतो, जो मोदींच्या हाताला लागलेलो नव्हतो. त्यामुळे अर्बन नक्षलच्या निमित्ताने तरी हाताला लागतो का, हे त्यांनी बघितलं. मुद्दा असा आहे की, मोदी हे २०१४ नंतरचे आहेत. भाजपा २०१४ नंतरची. त्याआधी तर मी काँग्रेससोबत होतो. २०१४ च्या निवडणुकीत सलग चार वेळा पराभूत झालेल्या जागा आम्हाला द्या, असं आम्ही काँग्रेसला म्हणालो होतो. काँग्रेसने का नाही दिल्या. काँग्रेसला हा प्रश्न का विचारला जात नाही, असं आंबेडकर म्हणाले.

मागच्या पत्रकार परिषदेतही मी सांगितलं की, आम्ही वंचितांच राजकारण करतोय आणि वंचितांच्या राजकारणाला विरोध म्हणून जे कुणी वंचितांचं काम करतील त्या सगळ्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान आहे. म्हणून मी पालघरच उदाहरण देईन. कम्युनिस्टांचं काम होतं. पालघरमधला आदिवासी बेरोजगार होता, मुंबईत कामगारांची गरज होती. या सगळ्या डाव्यांनी आदिवासींना कामाला का आणलं नाही. त्यांनी का दक्षिणेतून माणसं आणली. ती जर आणली नसती, तर कदाचित बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आपल्याला दिसलेही नसते. त्यामुळे वंचितांचं राजकारण करणाऱ्यांच्या भूमिकेविषयी संदिग्धता निर्माण केली जाते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

यावेळी आंबेडकरांनी मराठा आरक्षणातील अडथळ्यांवर भाष्य केलं. ‘वेगवेगळ्या समाज घटकांच्या आरक्षणावरून धग निर्माण झालेली आहे. त्यामुळे १०२वी घटनादुरुस्ती करण्याची आवश्यकता होती का?’ असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले,”बाबासाहेबांनी ज्यावेळी घटनादुरुस्ती मांडली होती. त्यावेळचं भाषण पुन्हा ऐकायला हवं. आरक्षण हे प्रशासनाचाच एक प्रकार आहे. बाबासाहेबांनी एकजिनसी समाजाचा मुद्दा मांडला होता, त्यासंदर्भात काही समान मुद्द्यांवर चर्चा करून एकत्र राहण्याबद्दल काहीही झालेलं नाही. त्याच्यामुळे आजही आपण कितीही म्हणालो की, मी जात मानत नाही, मी अमूक-तमूक मानत नाही. माझं म्हणणं आहे की, हे नाटक आहे. याबद्दल आपण सजग आहोत असं मला वाटतं. म्हणून माझी प्रगती झाली नाही, असं झाल्यावर इतरांच्या बरोबरीने येण्यासाठी काय मागतो, तर आरक्षण हा सोपा मार्ग झाला आहे.

दोरायस्वामी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जो निकाल दिला होता. त्यामध्ये किरवन ब्राह्मण ज्याला आपण म्हणतो, मद्रासमधल्या अशाच ब्राह्मणांना आरक्षण होतं. ते सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. तेव्हाच बाबासाहेबांनी तेव्हाच म्हटलं होतं की, आम्ही छोटी खिडकी खुली केली होती. ती खिडकी या निकालाने बंद केलीये. त्यामुळे येणाऱ्या सर्व सरकारांना या प्रश्नाला सामोरं जावं लागेल. परिणाम सर्व सरकारांना भोगावे लागतील. सरकारं हे भोगताना दिसत आहेत. म्हणून संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेत मी म्हटलंय की, सत्ता असल्याशिवाय हे होणार नाही. सत्ता नसल्यावर काहीच करता येणार नाही. दोराईस्वामी निकालाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असे मतही आंबेडकर यांनी व्यक्त केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button