…तर जनआक्रोशाला तोंड द्यावं लागेल !

Shailendra Paranjapeजम्बो कोविड सेंटरवर प्रशासनाने तसंच राजकीय नेतृत्वानंही लक्ष केंद्रित केल्यानं अखेर जम्बो कोविड सेंटरचं आरोग्य सुधारू लागलंय, ही चांगली बातमी पुणेकरांना मिळालीय. पण त्यारोबरच करोनाचा प्रादुर्भाव होणाऱ्या रुग्णांची संख्या पुणे शहराच्या संदर्भात रोजच्या रोज दीड ते दोन हजारपर्यंत जाऊन पोहोचलीय, ही चितेचीच बाब आहे. त्यातही अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचा आकडाही कमी होत नसल्याने तीदेखील चिंतेचीच बाब आहे.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुण्य़ातली रुग्णसंख्या, प्रादुर्भाव हे सारं कमी होण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी तंबीच दिलीय. पण मुळात करोनाचं संकट इतकं मोठं आहे की सुरुवातीपासूनचा आढावा घेतला तर आठ आठ दहा दहा आयएएस अधिकारी वेगवेगळ्या जबाबदाऱ्.यांसाठी पुण्यामधे नेमूनही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे करोना हे वास्तव आहे आणि जसजशी गरज लागेल त्याप्रमाणे आरोग्य सुविधा वाझवणे, हाच उपाय युद्धपातळीवर करण्याची गरज आहे.

पुण्याच्या सर्व रुग्णालयांमधे रुग्णांना वणवण करत फिरावं लागतंय आणि दैनिक वास्तव आहे. एक दोन दिवसाआड स्थानिक वृत्तपत्रातून बातम्या छापून येताहेत की रुग्णाची रुग्णवाहिकेतून पाच तास परवड आणि अखेर पाच सहा तास रुग्णालयांचे उंबरठे झिजवून घरापासून कुठे तरी लांब पंधरा किलोमीटरवरच्या रुग्णालयात कशीबशी एक खाट उपलब्ध झाली, असंही बातम्यांमधून समजतंय.

करोनाच्या अगदी पहिल्या लॉकडाऊनपासून विकेंद्रित पद्धतीने करोनाचा मुकाबला करायला हवा आणि त्यासाठी स्थानिक नेतृत्वाकडे म्हणजे राजकीय नेतृत्व आणि जिल्हाधिकारी पातळीवरचे प्रसासकीय नेतृत्व यांच्याकडे संपूर्ण करोना मुकाबल्याची धुरा सोपवली जायला हवी, असं आम्ही वेळोवेळी मांडलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरा लॉकडाऊन शिथील करतानाही यापुढे जिल्हा पातळीवर करोनाचा मुकाबला केला जावा, हीच अपेक्षा व्यक्त केली होती. राष्च्रीय पातळीवर पहिल्या दोन लॉकडाऊनमुळे करोनाचा राष्ट्रीय पातळीवरचा संसर्ग काही प्रमाणात रोखता आला होता. अमेरिकेसह अनेक रा,ट्रांनी करोना लाइटली घेतल्याने लाखो लोकांचे प्राण गमवावे लागलेत. तसं भारतात झालेलं नाही. पण दुसऱ्या लॉकडाऊननंतर राज्य पातळीवर विशेषतः सर्वच राज्यांमधे जिल्हापातळीवर विकेंद्रित पद्धतीने करोनाचा मुकाबला करणे आणि त्यासाठी आरोग्य सुविधा त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी देखील विकेंद्रित पद्धतीने निर्माण करणे, युद्धपातळीवर कोविड उपचारांच्या देखभालीच्या सुविधा उपलब्ध करणे गरजेचे होते.

पुण्यामधे आज औद्योगिक पातळीवरचा उत्पादित होणारा सारा प्राणवायू  लक्षात घेतला तर तो आरोग्य सेवेला लागणाऱ्या प्राणवायूच्या पुरवठ्यापेक्षा थोडाच जास्ती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात युद्धपातळीवर प्राणवायू निर्मितीवर भर देणंही गरजेचं होणार आहे. मुळात पुण्यासारख्या शहरात पालकमंत्री अजित पवार यांनी बैझकीत सांगितलंय त्यानुसार राज्याच्या सर्व भागातले रुग्ण उपचारांसाठी आलेले आहेत. पुण्यात उपचारांच्या किंवा आरोग्यसेवा चांगल्या असल्याचंच हे लक्षण आहे. पण त्याबरोबरच राज्याच्या सर्व भागात आरोग्चसेवा तितकीशी चांगली नाही, याचीच ही पावतीदेखील आहे.

त्यामुळे करोनाच्या संकटाच्या काळात युद्धपातळीवर सर्वच जिल्ह्यात आरोग्यसेवा बळकटीकरण करतानाच प्राणवायूनिर्मितीदेखील विकेंद्रित पद्धतीने राज्याच्या सर्व भागात मोठ्या प्रमाणावर होणं, ही आजची काळाची गरज आहे. पुण्यात रोजच्या रोज शहरात दोन हजार आणि जिल्ह्यातले दोन तीन हजार रुग्ण ही संख्या लक्षात घेतली तर कोणतीही यंत्रणा पुरेशी पडणार नाही आणि मग स्रावजनिक जनआकोर्शाला तोंड द्यावं लागू शकतं.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER